कोविडनंतर रुग्णांच्या रक्तात सापडल्या नव्या विसंगती; संशोधनात धक्कादायक निष्कर्ष

    21-Nov-2025
Total Views |
 
Covid
 Image Source:(Internet)
नागपूर :
कोरोना व्हायरसबद्दल नवी माहिती समोर येत असून लाँग कोविडशी (Covid) संबंधित एक महत्त्वाचा वैज्ञानिक पुरावा आता उघड झाला आहे. तज्ज्ञांच्या नव्या अभ्यासात असे आढळले आहे की, कोविडची लागण झाल्यानंतर अनेक रुग्णांच्या रक्तात सूक्ष्म गाठी (मायक्रोक्लॉट्स) तयार होत आहेत आणि शरीराच्या रोगप्रतिकारक व्यवस्थेतही लक्षणीय बदल होत आहेत.
 
काही लोकांना कोरोना इन्फेक्शननंतर काही दिवसांपुरती सर्दी, ताप, घसा दुखणे किंवा खोकला असे हलके त्रास जाणवतात. मात्र बऱ्याच जणांना दीर्घकाळ थकवा, अंगदुखी, ब्रेन फॉग आणि श्वास घेताना त्रास अशी लक्षणं भेडसावत राहतात. या स्थितीला ‘लाँग कोविड’ असे म्हटले जाते.
 
संशोधकांनी केलेल्या तपासात दोन मोठे बदल स्पष्ट झाले. पहिला म्हणजे रक्तात तयार होणारे मायक्रोक्लॉट्स आणि दुसरा म्हणजे न्यूट्रोफिल नावाच्या पांढऱ्या रक्तपेशींमध्ये होणारे अनोखे बदल. मायक्रोक्लॉट्स म्हणजे रक्तातील क्लॉटिंग प्रोटीनची अतिशय लहान गुठळी, जी पूर्वी कोविड रुग्णांमध्ये नोंदली गेली होती.
 
अभ्यासात असेही उघड झाले की लाँग कोविड रुग्णांमध्ये न्यूट्रोफिल पेशी स्वतःच्या DNA पासून ‘नेट्स’ (Neutrophil Extracellular Traps) नावाच्या जाळ्यासारख्या संरचना तयार करतात. या संरचना शरीरातील व्हायरस व हानिकारक कणांना पकडून नष्ट करण्याचे काम करतात.
 
शास्त्रज्ञांच्या मते मायक्रोक्लॉट्स आणि NETs एकमेकांशी संपर्कात आल्यावर शरीरात अशी प्रतिक्रिया शृंखला सुरू होते, जी पुढे जाऊन लाँग कोविडची लक्षणे निर्माण करू शकते. मायक्रोक्लॉट्स NETs ची निर्मिती वाढवतात आणि त्यामुळे रक्तात जळजळ व गाठी तयार होण्याची प्रक्रिया तीव्र होते.
 
लाँग कोविड रुग्णांच्या प्लाझ्माच्या अभ्यासातून हेही दिसून आले की, निरोगी व्यक्तींशी तुलना करता त्यांच्यात मायक्रोक्लॉट्स तसेच NETs चे प्रमाण खूपच जास्त असते. शिवाय या गुठळ्या आकारानेही नेहमीपेक्षा मोठ्या असतात.
 
अभ्यासाचे लेखक अलेन थियरी यांच्या म्हणण्यानुसार, मायक्रोक्लॉट्स आणि NETs यांच्यातील हा असामान्य परस्परसंवाद शरीरातील नैसर्गिक क्लॉट विघटन प्रक्रिया रोखू शकतो. त्यामुळे या गुठळ्या रक्तात जास्त काळ टिकून राहतात आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित गुंतागुंत निर्माण करतात.
 
जर्नल ऑफ मेडिकल व्हायरोलॉजीमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, NETs ची वाढलेली निर्मिती मायक्रोक्लॉट्सना अधिक स्थिर बनवते, ज्यामुळे लाँग कोविडची बरीच लक्षणे तीव्र होण्याची शक्यता वाढते.