Image Source:(Internet)
मालेगाव :
अल्पवयीन मुलीवरील क्रूर अत्याचार आणि हत्येच्या घटनेमुळे मालेगावात (Malegaon) आज रोषाची ठिणगी पेटली. आरोपीविरोधात न्याय मागण्यासाठी काढलेल्या आक्रोश मोर्चात काही आंदोलनकर्ते अचानक आक्रमक झाले. न्यायालयाच्या आवारातील गेट तोडत त्यांनी आत जाण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून जमावाला मागे ढकलले.
डोंगराळे गावात घडलेल्या या धक्कादायक गुन्ह्यात विजय खैरनार (२४) या युवकाने साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केली असल्याचे उघडकीस आले होते. घटनेनंतर गावकऱ्यांत तीव्र संताप उसळला असून आरोपीला कडक शासन देण्याची मागणी वाढत आहे.
पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक करून न्यायालयात हजर केले होते. त्याला सुरुवातीची चार दिवसांची पोलीस कोठडीही देण्यात आली होती. गुरुवारी त्याला पुन्हा अप्पर जिल्हा न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया होती. मात्र वाढत्या गर्दीमुळे आणि उद्रेक टाळण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया व्हिडिओ लिंकद्वारे पार पडली.
कोर्ट परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वातावरण तणावपूर्ण पण नियंत्रित आहे.