Image Source:(Internet)
नागपूर:
महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ (Ladki Bahin Yojana) अंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. योजनेअंतर्गत नोव्हेंबरच्या अखेरीस प्रत्येक लाभार्थीच्या खात्यात १५०० रुपये जमा होणार आहेत. राज्यातील अडीच कोटींपेक्षा अधिक महिलांनी योजनेचा लाभ घेतला असून, त्यांची ई-केवायसी प्रक्रिया सध्या सुरू आहे.
पण याच दरम्यान, योजनेचा गैरवापर झाल्याची धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. विविध सरकारी कर्मचारी, शिक्षक, पोलिस आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनीही या योजनेचा गैरफायदा घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सदर योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांमध्ये आतापर्यंत ५ हजार सरकारी कर्मचारी, ३ हजार शिक्षक तसेच काही जिल्हा परिषद कर्मचारी आणि पोलिसही समाविष्ट आहेत. उत्पन्नाची मर्यादा (अडीच लाख रुपये वार्षिक) असतानाही, अनेक जणांनी निवडणूक काळातील गडबडीचा फायदा उचलून अनधिकृतरीत्या लाभ घेतले आहेत.
कठोर कारवाईची तयारी-
या गैरफायद्याचा तपास सुरू असून, कोणकोणत्या विभागातील कर्मचारी योजनेचा गैरवापर करत आहेत ते लवकरच निश्चित केले जाणार आहे. त्यानंतर संबंधित विभागांना पत्रे पाठवण्यात येतील आणि शिस्तभंग प्रकरण म्हणून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तसेच, योजनेचा गैरफायदा घेतलेली रक्कम वसूल करून त्यांची पगारवाढ रोखण्यासंबंधी उपाययोजना देखील करण्यात येईल. महिला व बालविकास विभागाकडून ही कारवाई पुढील काळात प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
ई-केवायसीची मुदत वाढवली-
लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र महिलांनी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. पूर्वी ही प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करणे आवश्यक होते, मात्र लाखो महिलांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नसल्यामुळे महिला व बालविकास विभागाने ही मुदत वाढवून ३१ डिसेंबर २०२५ केली आहे. याशिवाय, ई-केवायसी न केल्यास योजनेचा लाभ भविष्यात मिळणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.
महायुती सरकारच्या या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या कमजोर महिलांना दीड हजार रुपये महिना मदत मिळत असतानाच, काही कर्मचारी आणि पात्र नसलेल्या लोकांनी याचा गैरफायदा करून योजना धोक्यात आणल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यापुढे योजनेच्या पारदर्शकतेसाठी आणि गैरफायद्याला आळा घालण्यासाठी कडक कारवाई होणार असल्याने संबंधितांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.