नांदेडमध्ये संतापजनक घटना; इंग्रजी शाळेतील शिक्षकाकडून 7 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार

    21-Nov-2025
Total Views |
- आरोपीला अटक

Nanded NewsImage Source:(Internet) 
नांदेड :
नांदेडला (Nanded) हादरवून सोडणारी एक भीषण घटना उघडकीस आली आहे. फक्त 7 वर्षांच्या निष्पाप मुलीवर तिच्याच शाळेतील शिक्षकाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड शहरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेणारी ही लहान मुलगी 19 नोव्हेंबर रोजीच्या घटनेनंतर सतत शाळेत जाण्यास नकार देत होती. पालकांनी कारण विचारले असता मुलीने शिक्षकाने केलेल्या घृणास्पद वर्तनाचा तपशील आईला सांगितला, त्यानंतर संपूर्ण प्रकरण स्पष्ट झाले.
 
या गंभीर आरोपानंतर मुलीच्या आईने भाग्यनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून आरोपी शिक्षक विशाल लोखंडे याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 64(2), 65(2), 351(2) तसेच POCSO कायद्याच्या कलम 468 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली आहे.
 
घटनेनंतर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.
 
उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैजंने यांनी सांगितले की, हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा, अशी विनंती न्यायालयाकडे करण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकरणातील पुढील कारवाईकडे राज्यातील सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
या हृदयद्रावक घटनेमुळे पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीरपणे पुढे आला असून शालेय संस्थांच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.