महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी; 40 वर्षांवरील कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय तपासणी अनिवार्य

    20-Nov-2025
Total Views |
 
Medical check up
 Image Source:(Internet)
नागपूर :
महाराष्ट्रातील (Maharashtra) राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. 40 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी नियमित वैद्यकीय तपासणी अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य शासनाने जाहीर केला आहे. यासाठी शासनाकडून आर्थिक मदतीचीही विशेष तरतूद करण्यात आली आहे.
 
आरोग्य विभागाने 2022 मध्ये वैद्यकीय तपासणीसंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. त्या सूचनांनुसार सामान्य प्रशासन विभागाने 17 जुलै रोजी नवीन शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. यानुसार राज्यातील सर्व विभागांमध्ये कार्यरत कर्मचारी आणि अधिकारी यांना ठराविक कालावधीत आरोग्य तपासणी करणे बंधनकारक असेल.
 
शासन निर्णयानुसार, 40 ते 50 वयोगटातील कर्मचाऱ्यांना दोन वर्षातून एकदा, तर 51 वर्षांवरील कर्मचाऱ्यांना दरवर्षी वैद्यकीय तपासणी करता येणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या तपासणीसाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला 5000 रुपयांपर्यंत खर्चाची प्रतिपूर्ती शासन देणार आहे.
 
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय तसेच त्याच्या अधिनस्त कार्यालयांतील कर्मचाऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. संबंधित कार्यालय प्रमुखांनी या योजनेचा लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती शासनाला वेळोवेळी सादर करणे आवश्यक आहे.
 
शासनाचा विश्वास आहे की या निर्णयामुळे कर्मचारी अधिक आरोग्य-जागरूक होतील, आजारांचे लवकर निदान होईल आणि प्रशासनाची एकूण कार्यक्षमता वाढेल. कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.