Image Source:(Internet)
मुंबई :
वरळीतील विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर राजकीय वर्तुळात सुरू झालेल्या चर्चांना आता पुष्टी मिळताना दिसत आहे. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे (MNS) यांच्यात जागावाटपाच्या प्राथमिक चर्चा प्रत्यक्षात सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे.
सूत्रांच्या अनुसार, शिवसेना ठाकरे गटाने मनसेला 70 ते 75 जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे. हे संकेत मिळाल्यानंतर आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र मैदानात उतरण्याची शक्यता आणखी मजबूत झाली आहे.
मनसेने काही दिवसांपूर्वी 125 जागांवर लढण्याची अंतर्गत तयारी केली होती. मात्र, आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये संवाद वाढला असून, पुढील काही दिवसांत आणखी महत्त्वाच्या बैठका होणार आहेत. यानंतरच अंतिम जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित होईल.
या घडामोडींमुळे मुंबईच्या स्थानिक राजकारणात नवे समीकरण आकार घेताना दिसत आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसने मनसेसोबत जाण्यास नकार देत मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय केला आहे. त्यामुळे शिवसेना–मनसे युतीची शक्यता अधिक ठळक बनली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी राजकारणाचा तापमान वाढवणारी ही मोठी घडामोड मानली जात आहे.