लाडकी बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता मिळणार का? अखेर दिलासा देणारी माहिती समोर!

    19-Nov-2025
Total Views |
 
Ladki Bahein Yojana
 Image Source:(Internet)
नागपूर :
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा माहोल चांगलाच रंगाला आला आहे आणि राज्यभर आचारसंहिता लागू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahein Yojana) नोव्हेंबर महिन्याचा हप्ता येणार की नाही, याबाबत लाभार्थी महिलांमध्ये मोठी उत्सुकता आणि संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती. राज्य सरकारने ई-केवायसीला मुदतवाढ दिली असली तरी हप्ता कधी जमा होणार, याबाबतची अधिकृत घोषणा न झाल्याने अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह होते.
 
दरम्यान, नोव्हेंबरच्या १५०० रुपयांच्या हप्त्याबाबत आता आश्वासक माहिती पुढे येत आहे. स्रोतांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आचारसंहिता लागू असली तरी योजनेचा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात कोणताही अडथळा येणार नाही. त्यामुळे लाडकी बहिणींसाठी ही अत्यंत सुखद बातमी ठरत आहे.
 
२ आणि ३ डिसेंबर रोजी नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे मतदान प्रक्रिया पार पडण्यापूर्वीच नोव्हेंबर हप्ता जाहीर होण्याची शक्यता प्रशासनाने नाकारलेली नाही. महिन्याचे १९ दिवस उलटून गेले तरी हप्ता जाहीरात न झाल्याने महिलांच्या चिंतेत भर पडली होती.
 
मात्र, उपलब्ध प्राथमिक माहितीनुसार नोव्हेंबरचा हप्ता या महिन्याच्या अखेरीस जमा होण्याची दाट शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार नियमित सरकारी योजना आचारसंहितेदरम्यानही सुरु राहू शकतात. त्यामुळे सरकार लवकरच अधिकृत घोषणा करेल, अशी चर्चा जोर धरत आहे.
 
हप्ता नियमित मिळावा यासाठी ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक असल्याचेही शासनाने स्पष्ट केले आहे. ई-केवायसी न केल्यास पुढील महिन्यांपासून लाभ मिळणार नाही. महिलांना पुरेसा वेळ मिळावा यासाठी सरकारने अंतिम तारीख वाढवून मोठा दिलासा दिला आहे.
 
अनेक महिलांना तांत्रिक अडचणी आल्याने पोर्टलमध्ये काही सुधारणाही करण्यात आल्या आहेत. घटस्फोटित किंवा विधवा महिलांनी आवश्यक कागदपत्रांच्या सत्यप्रत महिला व बालविकास विभागाकडे सादर करणे आवश्यक आहे.
 
जिल्हा तसेच पंचायत स्तरावर विशेष ई-केवायसी केंद्रे उभारून ग्रामीण भागातील महिलांना मदत दिली जात आहे. मोबाईल किंवा इंटरनेट उपलब्ध नसलेल्या महिलांसाठीही आवश्यक सुविधा उभारण्यात प्रशासन सक्रिय आहे.
 
राज्यातील लाखो महिलांसाठी ही योजना सर्वात महत्त्वाची असल्याने हप्ता वितरणाला उच्च प्राधान्य दिले जात आहे. निवडणुका सुरू असतानाही प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी, यासाठी विभागीय तपासण्या आणि तांत्रिक कामे गतीने सुरू आहेत. यामुळे नोव्हेंबरच्या हप्त्याची वेळेत प्राप्ती होण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.