नागपूरकर झाले झिंगाट’; अजय–अतुलच्या कॉन्सर्टने खासदार महोत्सवाचा भव्य समारोप

    19-Nov-2025
Total Views |
 
Ajay Atul
नागपूर :
हनुमाननगरातील क्रीडा चौकावर तब्बल १२ दिवस रंगलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सव-2025चा मंगळवारी दणदणीत समारोप झाला. संगीतक्षेत्रातील दिग्गज जोडी अजय–अतुल (Ajay Atul) यांनी केलेल्या लाईव्ह कॉन्सर्टने संपूर्ण पटांगण थरारून गेले. हजारोंच्या सागराने भरलेला परिसर, मोबाईल फ्लॅशलाइट्सची वलयं, आणि सातत्याने उसळणारा जल्लोष — नागपूरकरांनी खऱ्या अर्थाने ‘सुरांचा दरबार’ अनुभवल्या.
 
अजय–अतुलची दमदार एन्ट्री-
भव्य कोरस गीताने सुरुवात होताच वातावरणात उत्सुकता वाढली. ‘नटरंग उभा’ लागताच प्रेक्षागृहात आनंदाचा विस्फोट झाला. आणि अजय–अतुल मंचावर येताच टाळ्यांचा आणि घोषणा–जयजयकारांचा आवाज आकाश भरून राहिला. “नागपूरचं अपार प्रेम आम्हाला नव्या संगीताची ऊर्जा देते,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
 
भक्तिरसापासून ‘झिंगाट’पर्यंत—संगीताची परिपूर्ण मेजवानी-
‘इंद्र जिमि जंभ पर’, आई भवानीची आरती, मल्हार वारी, उधे ग अंबे उधे अशा भक्तिगीतांनी पटांगण भक्तिरसाने न्हाऊन निघाले.
 
मनीष आणि निहिराने सादर केलेल्या ‘जीव दंगला’ने जादू पसरली; तर ऋषिकेश रानडेंनी ‘अभी मुझमें कहीं’, ‘मेरे नाम तू’, ‘मन उधाण वाऱ्याचे’ अशा गीतांनी उपस्थितांची मने जिंकली.
 
नागपूरची शरयू दाते आणि अजय यांनी ‘धड़क है ना’ने रंगत आणखी वाढवली.
 
आणि शेवटी अजय–अतुलची सुपरहिट गाणी—सैराट झालं जी, झिंगाट, खेळ मांडला, वाजले की बारा, अप्सरा—लागताच नागपूरकर अक्षरशः थिरकू लागले. संपूर्ण मैदान फ्लॅशलाइट्सने उजळून निघाले.
 

Ajay Atul 
 
मान्यवरांची उपस्थिती; समारोपाला प्रतिष्ठेची जोड-
उपस्थितीत केंद्रीय मंत्री व महोत्सवाचे प्रणेते नितीन गडकरी, हुंडई इंडिया चे जिओजीक ली, आमदार सुमित वानखेडे, समीर कुणावर, माजी खासदार अजय संचेती, सुनील मेंढे आणि इतर मान्यवरांचा समावेश होता. सूत्रसंचालन बाळ कुलकर्णी आणि रेणुका देशकर यांनी केले.
 
अरिजित सिंगला नागपूरात आणण्याचा प्रयत्न करू – गडकरी
समारोप सोहळ्यात गडकरी म्हणाले, “श्रेयाघोषाल, शंकर महादेवन, अजय–अतुल यांसारखी दिग्गज मंडळी या मंचावर आली. पुढील वर्षी तरुणाईचा सुपरस्टार गायक अरिजित सिंगलाही नागपूरात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.” या घोषणेवर प्रेक्षकांनी जल्लोष करत टाळ्यांचा कडकडाट केला.
 
श्रेया घोषाल यांच्या कार्यक्रमात काहींना प्रवेश मिळाला नाही याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आणि महोत्सवाला आता आंतरराष्ट्रीय ओळख मिळाल्याचे सांगितले.