नागपुरात ८ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला होणार सुरुवात; राज्यपालांकडून अधिसूचना जाहीर

    18-Nov-2025
Total Views |
 
Winter session
 Image Source:(Internet)
नागपूर :
राज्याच्या राजकीय दिनदर्शिकेतील महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या हिवाळी अधिवेशनाची (Winter session) तारीख अखेर निश्चित झाली आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार अधिवेशनाची सुरुवात ८ डिसेंबरला नागपूरात होणार आहे. मात्र अधिवेशन किती कालावधीपर्यंत चालेल, हे अद्याप जाहीर झालेले नाही.
 
या पार्श्वभूमीवर नागपूर पुन्हा एकदा राजकारणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागांच्या मदत–पुनर्वसनाच्या मुद्द्यांवरून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता असून अधिवेशन गाजण्याचे संकेत आहेत.
 
२ डिसेंबरला राज्यातील २४६ नगर परिषद आणि ४२ नगर पंचायतींसाठी मतदान होणार आहे. ३ डिसेंबरला मतमोजणी होईल. त्यानंतर जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांचे वेळापत्रक समोर येण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या तणावात अधिवेशनाचे वेळापत्रक पुढे ढकलले जाईल, अशी चर्चा होती. परंतु राज्यपालांच्या अधिसूचनेने ही सर्व अटकळ धुळीस मिळाली.
 
अधिवेशनाच्या तयारीसाठी नागपूरात प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. सचिवालयाचे तात्पुरते कामकाज पुढील आठवड्यापासून नागपूरात सुरू होणार असून मंत्र्यांचे निवास व कार्यालयेही उपराजधानीत हलविण्याची प्रक्रिया सुरू आहे. शहरातील हॉटेल्स, विश्रामगृह आणि सरकारी निवासस्थाने पाहुण्यांनी गजबजणार आहेत.
 
दरम्यान, नागपूर पोलिसांनी सुरक्षा आराखडा तयार केला असून विधानभवन परिसरासह प्रमुख चौक, मार्ग आणि सरकारी इमारतींवर अतिरिक्त सुरक्षा तैनात होणार आहे. अधिवेशनादरम्यान हवाई आणि रेल्वे सेवांमध्ये वाढ करण्याबाबतही चर्चा सुरू आहे.
 
या सर्व व्यवस्थेमुळे नागपूर पुढील काही दिवसांत राजकीय हालचालींनी गजबजून जाणार असून शहरातील वातावरण पुन्हा एकदा अधिवेशनाच्या सणासुदीची रंगत घेणार आहे.