छत्तीसगडच्या जंगलात मोठी कारवाई; कुख्यात नक्षली कमांडर माडवी हिडमा ठार

    18-Nov-2025
Total Views |
 
Naxalite commander Madvi Hidma killed
 Image Source:(Internet)
 
छत्तीसगडच्या (Chhattisgarh) नक्षलप्रवण भागात मंगळवारी सकाळी सुरक्षा दलांनी राबवलेल्या विशेष मोहिमेत माओवादी चळवळीचा प्रमुख चेहरा मानला जाणारा माडवी हिडमा ठार झाला. अनेक वर्षे सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर असलेला हिडमा आणि त्याची पत्नी या दोघांना दलाने चकमकीत निष्प्राण केले.
छत्तीसगडच्या सीमेजवळ सकाळी लवकर सुरू झालेली कारवाई अनेक तास घनदाट जंगलात सुरू राहिली. डीआरजीच्या जवानांनी उभारलेल्या या मोहिमेत एकूण सहा नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. त्यात हिडमा आणि त्याची पत्नी या दोघांचा समावेश असल्याची अधिकाऱ्यांनी माहिती दिली. हिडमावर एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर होते, तसेच अनेक मोठ्या हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला होता.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या कर्रेगुट्टा मोहिमेत हिडमा थोडक्यात निसटला होता; मात्र या वेळी जवानांनी त्याला पळता भुई थोडी केली. बसवा राजूच्या मृत्यूनंतर संघटनेचे नेतृत्व हिडमाकडे देण्यात आले होते. त्यामुळे त्याचा मृत्यू हा माओवादी चळवळीला मोठा धक्का मानला जात आहे.
गेल्या काही वर्षांत सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधातील कारवाया तीव्र केल्यानंतर चळवळीची पकड कमकुवत होत असल्याचे चित्र आहे. हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षली संघटनांच्या मनोबलावर मोठा परिणाम होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.