Image Source:(Internet)
मुंबई :
राज्यातील लाखो महिलांसाठी महत्त्वाची ठरणारी ‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या ई-केवायसी (E-KYC) प्रक्रियेला आता अतिरिक्त वेळ मिळाला आहे. नैसर्गिक आपत्ती, तांत्रिक अडचणी आणि ओटीपीशी संबंधित समस्यांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ही मुदत १८ नोव्हेंबरऐवजी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती देताना सांगितले की, अनेक जिल्ह्यांत समोर आलेल्या आव्हानांचा सखोल आढावा घेऊनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे.
ओटीपी न मिळाल्याच्या तक्रारी गंभीर-
ई-केवायसी प्रक्रियेत महिलांच्या आधारकार्डवर तसेच वडील किंवा पतींच्या आधाराशी जोडलेल्या क्रमांकावर ओटीपी येणे अनिवार्य आहे. मात्र अनेकांना दुसरा ओटीपी मिळत नसल्याने प्रक्रिया अडकून राहत होती. विशेषतः नैसर्गिक आपत्तीत मोबाईल हरवणे, दस्तऐवजांचे नुकसान होणे किंवा महिलांच्या पती/वडिलांचे निधन झाल्यामुळे ओटीपी मिळणे अशक्य होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.
महिलांसाठी विशेष पर्याय उपलब्ध-
ज्या महिलांच्या पती अथवा वडिलांचे निधन झाले आहे किंवा त्या घटस्फोटित आहेत, त्यांनी ई-केवायसीसोबत मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोटाचा दाखला किंवा न्यायालयाचा आदेश सादर करून प्रक्रिया पूर्ण करता येईल, असेही मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केले.
कोणीही लाभापासून वंचित राहू नये सरकारचा निर्धार-
शासनाचा उद्देश कोणतीही पात्र महिला केवळ तांत्रिक किंवा अपरिहार्य कारणांमुळे योजनेच्या लाभांपासून वंचित राहू नये, हा असल्याचेही सांगण्यात आले. विस्तारित कालावधीत सर्व महिलांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहनही सरकारतर्फे करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे राज्यातील लाखो महिलांना मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.