Image Source:(Internet)
अरवल्ली (गुजरात) :
सोमवारी (17 नोव्हेंबर) सायंकाळी अरवल्ली (Aravalli) जिल्ह्यात घडलेल्या एका भीषण दुर्घटनेने संपूर्ण राज्याला शोकात बुडवले. मोडासा येथील राणासैयद चौकाजवळ धावत्या अॅम्बुलन्सला अचानक आग भडकली आणि काही क्षणांतच वाहन पूर्णतः ज्वाळांनी वेढले गेले. या दुदैवी घटनेत डॉक्टर, नर्स, नवजात बालक आणि त्याच्या वडिलांचा होरपळून मृत्यू झाला. अॅम्बुलन्सचा चालक आणि बालकाचा एक नातेवाईक मात्र पुढील बाजूने बाहेर पडल्याने थोडक्यात बचावले.
उपचारासाठी अहमदाबादला नेत असताना दुर्घटना-
ही अॅम्बुलन्स ऑरेंज हॉस्पिटलची असून एका दिवसाच्या नवजात बालकाला प्रसवानंतर पुढील उपचारांसाठी अहमदाबाद येथे नेण्यात येत होते. मोडासा शहरातून जात असताना अचानक मागील बाजूला आग लागली. काही सेकंदांतच ज्वाळांचा प्रचंड भडका उडाल्याने वाहनाच्या मागे असलेल्या डॉक्टर आणि नर्सला बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही. नवजात बालक आणि त्याच्या वडिलांचाही या आगीत दुर्दैवी अंत झाला.
स्थानिकांची धावपळ, अग्निशमन दलाची मदत-
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ नगरपालिका अग्निशमन दलाशी संपर्क साधला. दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. स्थानिक पोलिसांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. या घटनेचा CCTV फुटेजही समोर आला असून, पेट्रोल पंपाजवळ धगधगणारी अॅम्बुलन्स स्पष्टपणे दिसत आहे.
मृतांची ओळख-
या आगीत नर्स भाविकाबेन रमणभाई मनात (वय 22, मूळ चिठोडा, हिम्मतनगर), डॉक्टर राज शांतिलाल रेंटिया (वय 35, मूळ चिठोडा, हिम्मतनगर) यांसह नवजात बालक आणि त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे.
तांत्रिक बिघाडाचा प्राथमिक संशय-
पोलीसांनी दुर्घटनेची सखोल चौकशी सुरू केली असून, प्राथमिक अंदाजानुसार अॅम्बुलन्समध्ये झालेला शॉर्ट सर्किट किंवा इतर कोणताही तांत्रिक बिघाड हा आग लागण्यामागील प्रमुख कारण असू शकते. मात्र अधिकृत कारण तपासानंतरच निश्चित होईल.
मोडासा सारख्या शांत शहरात घडलेल्या या हृदयद्रावक दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, जीवन वाचवण्यासाठी असलेल्या अॅम्बुलन्स सेवांमधील सुरक्षेवरही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.