नागपूर जिल्ह्यात शिंदे सेनेचा सर्व जागांवर उमेदवारांचा निर्णय, महायुतीत दुरावा प्रकर्षाने जाणवला

    17-Nov-2025
Total Views |
 
Shinde Sena
 Image Source:(Internet)
नागपूर :
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महायुतीत तणावाचा सूर अधिक चढताना दिसत आहे. शिंदे (Shinde) सेनेने नागपूर जिल्ह्यातील सर्व 27 नगरपालिका आणि नगर पंचायतांच्या सर्व जागांसाठी स्वबळावर उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. भाजपकडून अंतिम निर्णय न आल्याने शिंदे गटाने स्वतंत्र लढण्याचा मार्ग स्वीकारला.
 
भाजप आणि शिंदे गटामध्ये गेल्या काही दिवसांत अनेक फेऱ्यांच्या चर्चा झाल्या, मात्र जागावाटपावर एकमत न झाल्याने सामंजस्याचा प्रस्ताव फसला. पक्षाचे आमदार आणि निवडणूक प्रभारी कृपाल तुमाने यांनी सांगितले की, सर्व इच्छुकांना ए-बी फॉर्म देण्यात आले असून १७ नोव्हेंबरला नामांकन दाखल करण्याची तयारी पूर्ण आहे.
 
यावेळी फक्त महायुतीच नव्हे, तर महाविकास आघाडीतील पक्षदेखील स्वतंत्रपणे मैदानात उतरले आहेत. काँग्रेसने निर्णयाची जबाबदारी स्थानिक पातळीवर टाकल्याने आघाडीतले सहयोगी पक्ष परस्परविरोधी भूमिकेत उभे ठाकले आहेत.
 
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये हातात हात घालून लढणारे पक्ष आता नगरपालिका निवडणुकांत थेट प्रतिस्पर्धी ठरणार असल्याने नागपूरच्या राजकारणात मोठी फेरबदल घडण्याची चिन्हे आहेत.
 
स्थानिक स्तरावरील या घडामोडींमुळे निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता असून, आता सर्वांचे लक्ष १७ नोव्हेंबरच्या नामांकन प्रक्रियेवर केंद्रित झाले आहे.