Image Source:(Internet)
पुणे :
महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या (ATS) अलीकडील कारवाईत शहरातील एका आयटी अभियंत्याचे धक्कादायक कट्टरवादी व्यवहार प्रकाशात आले आहेत. ९ ऑक्टोबर रोजी कोंढवा, खडकी वानवडी परिसरात करण्यात आलेल्या छापेमारीत १८ जणांची तपासणी झाली. यात झुबेर हंगरगीकर या तंत्रज्ञान क्षेत्रातील अभियंत्याकडून मोठ्या प्रमाणात दहशतवादाशी संबंधित साहित्य जप्त झाले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, झुबेर हा गेल्या दीड दशकापासून पुण्यातील नामांकित आयटी कंपन्यांत कार्यरत होता. सोलापूरमधील एका प्रतिष्ठित तंत्रज्ञान संस्थाातून बी.ई. केलेल्या झुबेरने हिंजवडीतील आयटी कंपनीत कारकीर्द सुरू केली. २०१२ नंतर तो कल्याणी नगरमधील सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करत होता. कोविडनंतर वर्क फ्रॉम होम आणि ऑफिस या दोन्ही पद्धतींनी तो कामकाज सांभाळत होता.
तांत्रिकदृष्ट्या कुशल असलेल्या या अभियंत्याचा धार्मिक अतिरेकी विचारसरणीकडे कल वाढत असल्याची माहिती तपासात समोर आली. कुटुंबात कठोर धार्मिक नियम, लोकशाहीविरोधी विचारप्रचार आणि युवकांना संविधानिक व्यवस्थेपासून दुरावण्याचे प्रयत्न तो सातत्याने करत होता. २०१५ च्या काळात त्याचा संपर्क पुणे व हैदराबादमधील संशयित कट्टरवादी घटकांशी आल्याचेही उघड झाले.
झुबेरच्या लॅपटॉप व मोबाईलमध्ये अल-कायदाची डिजिटल मासिके, ‘जिहाद’, ‘शहादत’, ‘लोन-वुल्फ’ हल्ल्यांवरील माहिती, तसेच स्फोटक तयार करण्याची तंत्रे यावरील मोठा डेटा आढळला. भारतात हिंसक जिहादद्वारे 'खिलाफत' स्थापनेचे उघड आवाहन करणारे साहित्यही त्याने मोठ्या प्रमाणात साठवले होते. फॉरेन्सिक तपासात त्याला आयईडी, स्फोटके व गनिमी युद्धतंत्राचे सखोल ज्ञान असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तो देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सोशल मीडिया गटांमध्ये सक्रिय असून, स्वतःचे गट तयार करून ‘गजवा-ए-हिंद’, ‘शरियत राज्य’ आणि ‘खिलाफत’विषयक प्रचार युवकांपर्यंत पोहोचवत होता. पुणे, सोलापूर आणि ठाणे येथे त्याने गुप्त बैठकींचे आयोजनही केल्याचे तपासातून पुढे आले आहे.
एटीएसच्या अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या साहित्याच्या चाचणीत अत्यंत धोकादायक अतिरेकी मजकूर आढळल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पुढील तपास वेगाने सुरू असून, झुबेरशी संबंधित संपर्क, नेटवर्क आणि संभाव्य षडयंत्राबाबत एटीएस सखोल चौकशी करत आहे.