Image Source:(Internet)
मुंबई :
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा पालघर साधू हत्याकांडाचा (Palghar sadhu murder case) मुद्दा पेटला आहे. 2020 मधील या प्रकरणाला पाच वर्षांनंतर अचानक पुन्हा हवा मिळण्यामागचं कारण म्हणजे काशिनाथ चौधरी यांचा भाजपामधील प्रवेश. यावरून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपावर जोरदार टीका केली असून, भाजपानेही तितक्याच कडक शब्दांत प्रतिउत्तर देत राजकीय वातावरण तापवलं आहे.
काशिनाथ चौधरी कोण? आणि वाद का?
काशिनाथ चौधरी हे पालघर परिसरातील सक्रिय नेते. ते पूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत होते.
पालघर साधू हत्याकांडाच्या वेळी जमावाला प्रवृत्त केल्याच्या आरोपांमध्ये त्यांचं नाव असल्याचा दावा भाजपाने केला होता.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घडलेल्या या घटनेत दोन साधू आणि चालकाची हत्या झाली. तपास सीबीआयकडे देण्याची मागणीही भाजपाने केली होती.
या पार्श्वभूमीवरच आता भाजपात चौधरींचा प्रवेश होताच राष्ट्रवादीकडून भाजपावर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले.
राष्ट्रवादीची भाजपावर तिखट टीका-
कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी X वरून भाजपावर जोरदार हल्ला चढवला.
त्यांनी विचारले,ज्यांना तुम्हीच मुख्य आरोपी म्हणत होता, त्यांनाच आता भाजपात घेतलं. मग पालघर हत्याकांडामागे भाजपच होता का?त्यांनी भाजपाच्या हिंदुत्वावरही निशाणा साधत म्हटलं.ढोंगी आणि बेगडी हिंदुत्व! राजकारणासाठी तुमची कुठल्याही थराला जाण्याची तयारी. समाजात दरी निर्माण करून भाजप सत्ता मिळवते आणि राज्याची हानी होते.भाजपचे_गलिच्छ_राजकारण हा हॅशटॅगही रोहित पवारांनी वापरला.
भाजपाचे प्रतिउत्तर — “किती नीच पातळी गाठणार?”
भाजपाचे माध्यम समन्वयक नवनाथ बन यांनी राष्ट्रवादीवर पलटवार केला.
त्यांचे म्हणणे,“कालपर्यंत चौधरी तुमच्याच पक्षात होते, तेव्हा ते निर्दोष होते. आता भाजपात आले म्हणून अचानक मुख्य आरोपी?”
“तिन्ही FIR, CID-CBI तपास, आणि चार्जशीटमध्ये त्यांचं नावच नाही. तरीही खोटं पसरवताय.”
“किती नीच पातळी गाठणार?”
तसेच त्यांनी तत्कालीन MVA सरकारवरही हल्ला करत सांगितलं—
“हत्याकांडानंतर 27 दिवस तपास दडपून ठेवला. दोषी कोणताही असो, भाजपाचं धोरण ‘NO MERCY’!”
राजकीय तापमान वाढलं-
पाच वर्षे शांत असलेलं पालघर साधू हत्याकांड आता काशिनाथ चौधरींच्या भाजप प्रवेशामुळे पुन्हा चर्चेत आलं आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांवर केलेल्या घणाघाती आरोपांमुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून, हा मुद्दा पुढे आणखी किती मोठा वाद निर्माण करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.