PM किसानचा 21 वा हप्ता 19 नोव्हेंबरला; देशभरातील शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

    17-Nov-2025
Total Views |
 
PM Kisan
 Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 21 वा हप्ता 19 नोव्हेंबरला जारी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा हप्ता औपचारिकरीत्या जाहीर केला जाईल. या दिवशी देशभरातील सुमारे 10 कोटी शेतकऱ्यांच्या (Farmers) बँक खात्यात 2,000 रुपयांची मदत थेट जमा होणार आहे. रब्बी हंगामाच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही मोठी आर्थिक मदत मानली जात आहे.
 
केंद्र सरकारने हप्त्याच्या वितरणासाठी सर्व प्रशासकीय पडताळणी प्रक्रिया जवळजवळ पूर्ण केल्या असून बँकिंग व्यवस्थाही व्यवहारांसाठी सज्ज आहे. यापूर्वी 20 वा हप्ता 2 ऑगस्ट रोजी जारी झाला होता आणि वाराणसी येथून पंतप्रधानांनी लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात कोट्यवधींची रक्कम एकाच वेळी हस्तांतरित केली होती.
 
दरम्यान, पूर आणि भूस्खलनामुळे मोठे नुकसान झालेल्या पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशला 26 सप्टेंबर रोजीच आगाऊ हप्ता देण्यात आला होता. त्यानंतर जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांनाही 7 ऑक्टोबरला मदत मिळाली. आता उर्वरित राज्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यातील रक्कम 19 नोव्हेंबरला जमा होणार आहे.
 
फेब्रुवारी 2019 पासून सुरू असलेली पीएम-किसान योजना आज देशातील 10 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आहे. शेतकऱ्यांना वर्षातून तीनवेळा मिळणारी एकूण 6,000 रुपयांची मदत त्यांच्या शेतीच्या गरजांसाठी महत्त्वाची ठरत असल्याचे सरकारचे मत आहे. भविष्यात ही योजना आणखी पारदर्शक आणि सक्षम करण्याची तयारीही सरकारकडून व्यक्त करण्यात आली आहे.