छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी मोहीम; सुकम्यात सुरक्षा दलांच्या कारवाईत ३ नक्षलवादी कंठस्नान

    17-Nov-2025
Total Views |
 
Naxalites killed
 Image Source:(Internet)
सुकमा (छत्तीसगड) :
छत्तीसगडच्या (Chhattisgarh) नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात रविवारी सकाळी झालेल्या जोरदार चकमकीत सुरक्षा दलांनी तीन नक्षलवाद्यांना ठार केले. विशेष नक्षलविरोधी मोहिमेत सहभागी असलेले DRG चे पथक बेज्जी–चिंतागुफा परिसरातील दुर्गम जंगल पट्ट्यात गस्त घालत असताना नक्षलवाद्यांनी अचानक हल्ला चढवला. त्यानंतर काही वेळा दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू राहिला, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक किरण चव्हाण यांनी दिली.
 
चकमक थांबल्यानंतर परिसराची पाहणी केल्यावर दोन महिलांसह तिघा नक्षलवाद्यांचे मृतदेह सुरक्षा दलांच्या हाती लागले. त्या ठिकाणावरून .303 रायफल, बॅरल ग्रेनेड लाँचर (BGL) आणि विविध स्फोटक साहित्य सुद्धा जप्त करण्यात आले.
 
ओळख पटल्यावर मृत नक्षलवाद्यांमध्ये —
मदवी देवा, एरिया कमिटी सदस्य
पोडियम गांगी, सीएनएम कमांडर
सोढी गांगी, किस्ताराम एरिया कमिटी
असल्याचे समोर आले. दोन्ही महिला नक्षलवाद्यांवर प्रत्येकी पाच लाख रुपयांचे इनामी पारितोषिक घोषित होते. मदवी देवा ही कोंटा विभागातील धोकादायक स्नायपर म्हणून ओळखली जात होती आणि नागरिकांवरील अनेक हल्ल्यांमध्ये ती सहभागी होती, असेही अधिकाऱ्यांकडून सांगितले गेले.
 
घटनास्थळाभोवती सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात शोधमोहीम सुरू ठेवली आहे. बस्तर रेंजचे आयजी सुंदरराज पाटीललिंगम यांनी सांगितले की, बस्तर विभागातील नक्षल चळवळ आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली असून बहुसंख्य सक्रिय सदस्यांना सुरक्षा दलांनी निष्क्रीय केले आहे.
 
त्यांनी पुढे सांगितले की, यंदा बस्तर विभागात आतापर्यंत २३३ नक्षलवादी मारले गेले, ज्यात केंद्रीय समिती व दंडकारण्य विशेष प्रादेशिक समितीचे सदस्यही आहेत. केंद्र सरकार मार्च 2026 पर्यंत नक्षलवादाचे संपूर्ण निर्मूलन करण्याच्या रणनीतीवर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.