बिहारमध्ये सत्ता उलथापालथीची चिन्हं? महायुतीच्या महाविजयानंतरही बिगर-भाजप सरकारची चर्चा गतीमान

    15-Nov-2025
Total Views |
 
Bihar
 Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
बिहार (Bihar) विधानसभा निवडणुकांचे निकाल स्पष्ट झाले असून भाजप–जेडीयू महायुतीने दमदार विजय मिळवत पुन्हा सत्ता काबीज केली आहे. मात्र विजयाची धामधूम सुरू असतानाच पाटण्यात राजकीय समीकरणं पुन्हा ढवळून निघाल्याची चर्चा जोर धरू ला)गली आहे. नितीश कुमार मुख्यमंत्रीपदी कायम राहणार की वेगळं राजकीय गणित रचलं जाणार, यावर आता सगळ्यांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
 
भाजपने 89 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला असून जेडीयूने 85 जागा पटकावल्या आहेत. अंकगणित महायुतीच्या बाजूने असलं तरी राजकीय आकडेमोड मात्र वेगळ्याच दिशेने जाताना दिसत आहे. सुरुवातीला मुख्यमंत्रीपदाचा दावा ठामपणे मांडणाऱ्या भाजपने आता सूर बदलल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.
 
दरम्यान, दहाव्यांदा मुख्यमंत्री होण्याची शक्यता निर्माण झालेल्या नितीश कुमार यांच्या हालचालींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांच्या हातात पुन्हा काडी फिरवण्याची ताकद असल्याचा दावा अनेक राजकीय निरीक्षक करत आहेत. बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 122 आकड्याच्या तुलनेत जेडीयूकडे आधीच 85 आमदारांचा मजबूत गट आहे. काही विरोधकांना पाठिंबा वळवण्यात ते यशस्वी झाले, तर ‘बिगर भाजप’ सरकार हे नुसतं स्वप्न राहणार नाही, असं समीकरण सूचित करत आहे.
 
आरजेडी, काँग्रेस, एआयएमआयएमसह इतर काही आमदारांचा अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष पाठिंबा जर नितीश कुमार यांच्या बाजूने झुकला, तर बिहारची सत्ता एका रात्रीत बदलण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञ वर्तवू लागले आहेत. निकाल जाहीर झाला असला तरी सत्तेचा अंतिम खेळ अजूनही सुरू असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे.
 
महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय घटनांची पुनरावृत्ती बिहारमध्ये पाहायला मिळणार का? असा प्रश्न आता अधिकच तीव्र झाला आहे.