नागपूरमध्ये ‘ऑपरेशन शक्ती’अंतर्गत देहव्यापाराचा भांडाफोड, अल्पवयीन मुलीची सुटका,महिलेला अटक!

    15-Nov-2025
Total Views |
 
minor girl rescued
 Image Source:(Internet)
नागपूर :
शहरातील मानवी तस्करी आणि देहव्यापारावरील आळा घट्ट करण्यासाठी क्राईम ब्रांचच्या सोशल सिक्युरिटी विंगने गुरुवारी उशिरा रात्री मोठी मोहीम हाती घेतली. उमरेड रोडवरील एका लॉजमध्ये टाकलेल्या धाडीत पोलिसांनी एक अल्पवयीन मुलगी (Minor girl) वाचवली, तर ४५ वर्षीय संशयित महिला एजंटला पकडले.
 
पोलिस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी दिलेल्या सूचनांनुसार १३ ते १४ नोव्हेंबरदरम्यान शहरातील संवेदनशील भागांत गस्त वाढवण्यात आली होती. मिळालेल्या अतिशय खात्रीशीर माहितीनुसार पथकाने बहादुरा फाटा परिसरातील हॉटेल यशराज इन येथे मध्यरात्री कारवाई केली.
 
छाप्यात विद्या धनराज फुलझेले (४५), रा. शारदा लेआउट, खरबी, ही महिला अल्पवयीन मुलींना पैशाच्या आमिषाने ग्राहकांकडे सोपवत असल्याचा संशय निर्माण झाला आणि तिला ताब्यात घेण्यात आले. त्याचवेळी एका पीडित अल्पवयीन मुलीची सुरक्षित सुटका करण्यात आली.
 
या धाडीत पोलिसांच्या हाती २,५०० रोकड, मोबाईल फोन, DVR व अन्य साहित्य, एकूण २०,७३० किमतीचा मुद्देमाल लागला. घटनेनंतर हुडकेश्वर पोलिसांनी कलम १४३(४) बीएनएस आणि पीटा कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
 
ही कारवाई वरिष्ठ अधिकारी – अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) वसंत परदेशी, डीसीपी राहुल मकनिकर, एसीपी अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पीआय राहुल शिरे, PSI प्रकाश माठणकर व त्यांच्या टीमने केली.