श्रीनगरमध्ये पोलिस स्टेशनजवळ प्रचंड स्फोट; ९ जणांचा मृत्यू, २९ गंभीर जखमी

    15-Nov-2025
Total Views |
 
Shrinagar Blast
 (Image Source-Internet)
श्रीनगर :
दिल्लीत झालेल्या भीषण स्फोटानंतर अवघ्या काही तासांतच श्रीनगरमध्येही (Srinagar) भयावह घटना घडली. नौगाम पोलिस स्टेशनच्या परिसरात शुक्रवारी रात्री सुमारे ११.३० वाजता अचानक जोरदार स्फोट झाला. या दुर्घटनेत ९ जणांचा जीव गेला असून, २९ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये पोलिस कर्मचारी, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि काही स्थानिक नागरिकांचा समावेश आहे.
 
स्फोटाचा प्रभाव इतका व्यापक होता की पोलिस स्टेशनच्या शेजारील घरांमधील काचा फुटल्या, काही गाड्या जळून खाक झाल्या आणि परिसरात धुराचे प्रचंड ढग पसरले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ज्वाळांचे मोठे लोट दिसतात.प्राथमिक तपासात समोर आले की जप्त केलेल्या स्फोटकांचे परीक्षण सुरू असताना ही दुर्घटना घडली. एफएसएलची टीम, पोलिस अधिकारी आणि महसूल विभागाचे अधिकारी अमोनियम नायट्रेटसह काही अस्थिर स्फोटकांची तपासणी करत होते. हे साहित्य फरीदाबादहून आणून नौगाम स्टेशनमध्ये ठेवण्यात आले होते. तपासणीदरम्यानच अचानक स्फोट झाल्याने सर्वत्र गोंधळ उडाला.
 
अग्निशमन दलाने क्षणार्धात घटनास्थळी धाव घेत आग विझवली. जखमी व्यक्तींना त्वरित जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून, काहींची प्रकृती नाजूक आहे.पोलिस स्टेशन रहिवासी भागाच्या अगदी जवळ असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली. अनेकांनी घराबाहेर येत सुरक्षित स्थळी आसरा घेतला. सुरक्षा दलांनी तातडीने परिसर बंद करून तपास सुरू केला आहे.
 
प्राथमिक तपासातून हे स्फोटक जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नुकत्याच या परिसरात जेईएमशी संबंधित भित्तिपत्रके आढळल्यानंतर तपास यंत्रणा अधिक सतर्क होत्या.
 
दहशतवादविरोधी पथकाने या प्रकरणात मोठी कारवाई करत विविध राज्यांमध्ये छापे टाकले. यात डॉक्टर, एक इमाम आणि काही ‘व्हाइट कॉलर’ संशयितांसह एकूण १५ जणांना अटक करण्यात आली. मुख्य आरोपी डॉक्टर उमर यांच्या घरातून अनेक महत्वाचे पुरावे मिळाल्याचे समजते. पोलिसांनी त्यांचे घरही पाडले.
 
एनआयएने या स्फोटाचा तपास ताब्यात घेऊन पुढील अटकसत्र सुरू केले आहे.घटनेची माहिती मिळताच केंद्र सरकारने तत्काळ दखल घेतली. गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीर प्रशासनाशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी पीडितांच्या कुटुंबीयांसाठी मदतीची घोषणा केली आहे. श्रीनगर तसेच संपूर्ण खोऱ्यातील सुरक्षा यंत्रणा अलर्टवर ठेवण्यात आल्या आहेत.