संभाजीनगरात भाजप युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ; परिसरात शोककळा

    15-Nov-2025
Total Views |
 
Sambhajinagar
 Image Source:(Internet)
 
छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश रघुनाथ टेमकर यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने गंगापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. नळकांडी पुलालगतच्या झुडपांत हा मृतदेह पाहून नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली.
भालगावचे रहिवासी असलेल्या टेमकर यांचा मृतदेह नारावाडी शिवारातील रस्त्याच्या कडेला आढळला. प्राथमिक तपासात मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. अचानक मृत्यूमुळे संशयाची छाया गडद झाली असून ही घटना हत्या की आत्महत्येची, याबाबत पोलिस विविध कोनातून चौकशी करत आहेत.
घटनास्थळी पंचनामा करून गंगापूर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलवला आहे. टेमकर यांच्या निधनाने स्थानिक राजकीय वातावरणात प्रचंड खळबळ माजली असून गावात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.