Image Source:(Internet)
मुंबई :
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तब्बल १२ दिवसांच्या उपचारांनंतर अखेर त्यांना घरी सोडण्यात आले असून डॉक्टर त्यांच्यावर घरच्या घरी उपचार करत आहेत. या काळात त्यांचा मुलगा सनी देओल (Sunny Deol) स्वतः वडिलांची काळजी घेत आहे.
धर्मेंद्र घरी परतल्याचं कळताच अनेक चाहते आणि कलाकार त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आले. हेमा मालिनी, ईशा देओल आणि अमिताभ बच्चन यांनीही धर्मेंद्र यांना भेट दिली. परंतु त्यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात जमलेल्या फोटोग्राफर्स आणि चाहत्यांमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी सनी देओलने संयम गमावला आणि माध्यम प्रतिनिधींवरच संताप व्यक्त केला. सध्या सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात सनी अत्यंत तणावग्रस्त आणि व्यथित दिसत आहेत.
घरात प्रवेश करताना छायाचित्रकारांनी त्यांच्याकडे सतत कॅमेरे वळवले, नावाने हाका मारल्या. त्यावर सनीने मागे वळून हात जोडले आणि रागाने म्हणाले. थोडी तरी लाज बाळगा! तुम्हालाही आईवडील आणि मुले आहेत. अशा वेळेला फोटो काढणे योग्य आहे का?
या घटनेमुळे सनी देओलचा भावनिक आवेग स्पष्टपणे दिसून आला. देओल कुटुंब सध्या वडिलांच्या प्रकृतीमुळे चिंतेत आहे.
दरम्यान, धर्मेंद्र यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.धर्मेंद्र यांची तब्येत अजून स्थिर नाही, पण ते घरी आल्याने आम्हाला थोडा दिलासा मिळालाय. सध्या सर्व काही देवाच्या हाती आहे. सर्वांनी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करावी.”