Image Source:(Internet)
मुंबई :
राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या २० हजार कोटींच्या मदतीचा जीआर (GR) अखेर जारी झाला असून, या निधीचा लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होऊ लागला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही मोठी घोषणा राज्याचे कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी बुधवारी केली.
कृषिमंत्री भरणे म्हणाले की, राज्यभरातील शेती व पिकांचे झालेलं नुकसान स्थानिक प्रशासनाच्या अहवालावरून निश्चित करण्यात आले असून, केंद्राच्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एनडीआरएफ)च्या निकषांनुसार मदतीचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. केंद्राकडूनही लवकरच अतिरिक्त मदतीची घोषणा होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. “राज्य सरकारने जाहीर केलेली सर्व मदत एकही रुपया अडवता न ठेवता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात दिली जाईल,” असे भरणे यांनी स्पष्ट केले.
स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी राष्ट्रवादी सज्ज-
यावेळी कृषिमंत्री भरणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक तयारीबाबतही भाष्य केले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी नुकत्याच पुण्यात पक्ष कार्यकर्त्यांसोबत घेतलेल्या बैठकीबाबत बोलताना भरणे म्हणाले, “पक्षाच्या जागा कशा वाढतील याबाबत सूचना मागविण्यात आल्या असून, अंतिम निर्णय अजित पवार घेतील. राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक जागा मिळवून देण्यासाठी पक्ष पातळीवर ठोस धोरण आखले जात आहे.”
कार्यकर्त्यांच्या मतांना प्राधान्य-
“उमेदवारीसाठी स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना आणि अपेक्षा जाणून घेतल्या जात आहेत. कार्यकर्त्यांचा सन्मान राखून निर्णय घेतले जातील,” असेही भरणे यांनी सांगितले. काही ठिकाणी महायुतीतील मित्रपक्ष भाजप आणि शिवसेनेसह स्थानिक पातळीवर समन्वय साधला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
मुंढवा जमीन प्रकरणावर मौन-
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुत्र पार्थ पवार यांचा उल्लेख असलेल्या मुंढवा जमीन प्रकरणावर विचारले असता, कृषिमंत्री भरणे यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. “या प्रकरणी अजितदादांनी स्वतः सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. त्यानंतर मला काही बोलणे योग्य ठरणार नाही,” अशी सावध भूमिका त्यांनी घेतली.
शेतकऱ्यांसाठीचा हा निधी थेट खात्यात जमा होऊ लागल्याने राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये दिलास्याची भावना निर्माण झाली आहे.