अयोध्येतील राम मंदिरावर दहशतवादी हल्ल्याचा डाव; लाल किल्ला स्फोटानंतरच्या चौकशीत खुलासा!

    12-Nov-2025
Total Views |
 
Terrorist attack plot on Ram temple in Ayodhya
Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
राजधानीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या तपासात असे धक्कादायक उघड झाले आहे की, हा स्फोट दिल्लीवर हल्ला करण्यासाठी नव्हता, तर दहशतवाद्यांचा खरा उद्देश अयोध्या (Ayodhya) आणि वाराणसीतील धार्मिक स्थळांवर विध्वंसक कारवाई करण्याचा होता. तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हा हल्ला एका मोठ्या दहशतवादी कटाचा भाग होता.
 
सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेची आखणी अनेक दिवसांपूर्वी करण्यात आली होती. अयोध्येतील नियोजित स्फोटाच्या तयारीदरम्यान अडचणी निर्माण झाल्याने दहशतवाद्यांनी घाईघाईत दिल्लीमध्ये कारवाई केली. स्फोटक सामग्री बांगलादेश आणि नेपाळच्या मार्गाने देशात आणली गेल्याची शक्यता तपासात समोर आली आहे.
 
चौकशीत अटक करण्यात आलेल्या आरोपींनी कबूल केले की त्यांनी अयोध्या आणि वाराणसीतील पवित्र स्थळांना लक्ष्य करण्यासाठी स्वतंत्र गट तयार केला होता. शाहीन नावाच्या एका महिलेनं अयोध्येत स्लीपर सेल कार्यरत केल्याचंही उघड झालं आहे. वेळेवर मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे सुरक्षा दलांनी ही संपूर्ण कारवाई उधळून लावली आणि संभाव्य भीषण हल्ला टाळला.
 
तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, लाल किल्ला परिसरातील स्फोट नियोजित नव्हता, तर अतिघाईत करण्यात आला. या स्फोटात टायमरचा वापर नव्हता, आरोपी उमर स्वतः गाडी चालवत होता आणि स्फोट होण्यापूर्वी ती गाडी जवळपास तीन तास त्या परिसरात उभी होती.
 
दरम्यान, तपास यंत्रणांना आतापर्यंत २,९०० किलो स्फोटके जप्त करण्यात यश आलं असून, अजूनही सुमारे ३०० किलो अमोनियम नायट्रेटचा साठा शोधात आहे. देशभरात मोठ्या प्रमाणात छापेमारी सुरू असून, सुरक्षा दलांनी सर्व संवेदनशील भागांत सतर्कता वाढवली आहे.