राज्यातील विद्यार्थ्यांसाठी आनंदवार्ता; आता वर्षातून दोनदा होणार CET परीक्षा ,चंद्रकांत पाटलांची घोषणा

    12-Nov-2025
Total Views |
 
Chandrakant Patil
 Image Source:(Internet)
मुंबई :
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या दिशेने महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET) कक्षाने पीसीएम (Physics, Chemistry, Maths), पीसीबी (Physics, Chemistry, Biology) आणि एमबीए (MBA) या अभ्यासक्रमांसाठी आता वर्षातून दोनदा सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या निर्णयाला मंजुरी दिली असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना आता प्रवेशासाठी अधिक संधी मिळणार आहेत.
 
दोन वेळा परीक्षा – विद्यार्थ्यांसाठी दुहेरी संधी-
राष्ट्रीय स्तरावर जसे JEE परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातात, त्याच पद्धतीने महाराष्ट्रातही सीईटी परीक्षा दोन टप्प्यांत घेतली जाणार आहे. पहिली परीक्षा एप्रिल 2026 मध्ये तर दुसरी परीक्षा मे 2026 मध्ये होणार आहे. पहिली परीक्षा देणे सर्व विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक असेल, तर दुसरी परीक्षा ऐच्छिक राहील.
 
जर विद्यार्थ्यांनी दोन्ही परीक्षा दिल्या, तर त्यातील जास्त गुणांची परीक्षा प्रवेशासाठी ग्राह्य धरली जाईल. यामुळे विद्यार्थ्यांना पहिल्या परीक्षेनंतर आपली कामगिरी सुधारण्याची आणि चांगले गुण मिळविण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
 
सीईटी वेळापत्रक लवकरच जाहीर होणार-
या निर्णयासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, सीईटी कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तसेच तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर उपस्थित होते.
राज्य सीईटी कक्षाकडून एप्रिल आणि मे 2026 मध्ये होणाऱ्या दोन्ही परीक्षाांचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे.