रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी;कोकण रेल्वेकडून ‘डीजी लॉकर’ची आधुनिक सुविधा सुरू

    12-Nov-2025
Total Views |
 
Konkan Railway
 Image Source:(Internet)
रत्नागिरी :
प्रवाशांच्या सुरक्षेला आणि सोयीला प्राधान्य देत कोकण (Konkan) रेल्वेने प्रवासादरम्यानच्या तणावाला मोठा आराम देणारी नवी सुविधा सुरू केली आहे. आता प्रवाशांना आपले मौल्यवान सामान बिनधास्तपणे स्टेशनवर ‘डीजी लॉकर’मध्ये ठेवता येणार आहे.
 
रत्नागिरी, थिवीम आणि उडुपी या प्रमुख स्थानकांवर १६ ऑक्टोबरपासून ही अत्याधुनिक सेवा सुरू करण्यात आली असून, ती प्रवाशांसाठी २४ तास उपलब्ध राहणार आहे. प्रवासात जड बॅगा किंवा महागड्या वस्तू घेऊन फिरण्याची गरज आता उरणार नाही.
 
वापरण्याची सोपी प्रक्रिया -
या ‘डीजी लॉकर’चा वापर करणे अत्यंत सोपे आहे. प्रवाशांनी स्टेशनवरील क्यूआर कोड स्कॅन करून डिजिटल पेमेंट करायचे. यूपीआय, डेबिट किंवा क्रेडिट कार्डसह विविध डिजिटल माध्यमांतून पेमेंट करता येते. काही क्षणांतच लॉकर आपोआप उघडतो आणि प्रवासी त्यात आपले सामान सुरक्षित ठेवू शकतात.
 
कोकण रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे की, ही सेवा प्रवाशांना सुरक्षित आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव देण्यासाठी उपयुक्त ठरेल. विशेषतः सणासुदीच्या काळात किंवा लांब प्रवासादरम्यान ही सुविधा प्रवाशांसाठी वरदान ठरण्याची शक्यता आहे.
 
डिजिटल इंडियाच्या उपक्रमाला चालना देण्यासाठी कोकण रेल्वेने हा उपक्रम राबवला आहे. लवकरच ही सेवा इतर महत्त्वाच्या स्थानकांवरही उपलब्ध करून देण्याची तयारी रेल्वे प्रशासनाने केली आहे. त्यामुळे संपूर्ण कोकण रेल्वे मार्गावर स्मार्ट आणि सुरक्षित लॉकर नेटवर्क उभे राहणार आहे.