ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची तब्येत चिंताजनक, व्हेंटिलेटरवर उपचार सुरू; चाहत्यांमध्ये चिंता!

    10-Nov-2025
Total Views |
 
Dharmendra
Image Source:(Internet) 
मुंबई :
बॉलीवूडमधील दिग्गज कलाकार धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या प्रकृतीबाबत चिंताजनक बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल असून, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
 
सुरुवातीला त्यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, रुग्णालयात भेट देणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यांना काही दिवसांपूर्वी ICU मध्ये हलवण्यात आलं होतं. ताज्या माहितीनुसार, आज सकाळी त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या डॉक्टरांचे विशेष पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे आणि ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याची माहिती मिळते. तथापि, त्यांच्या आरोग्याविषयी अधिकृत निवेदन अद्याप समोर आलेले नाही.
 
धर्मेंद्र यांच्या प्रकृतीमुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण-
धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत बातमी समोर आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये प्रचंड चिंता निर्माण झाली आहे. रुग्णालयाबाहेर चाहत्यांची गर्दी वाढत आहे. धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांची रुग्णालयात ये-जा सुरू असून, सर्वजण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करत आहेत.
 
धर्मेंद्र: बॉलीवूडचा 'ही-मॅन' आणि अमर कारकीर्द-
धर्मेंद्र हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. सहा दशकांच्या त्यांच्या प्रवासात ‘शोले’, ‘चुपके चुपके’, ‘सत्यकाम’, ‘सीता और गीता’, ‘धर्मवीर’ यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट त्यांनी दिले. त्यांच्या रौद्र पण भावनिक अभिनयशैलीमुळे ते आजही चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत.
 
सध्या संपूर्ण देशातून धर्मेंद्र यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी “गेट वेल सून धर्मेंद्र” असे संदेश शेअर करत आपली काळजी व्यक्त केली आहे