विदर्भात थंडीचा जोर वाढला; गोंदिया सर्वात थंड, नागपुरातही गारवा!

    10-Nov-2025
Total Views |
 
Cold weather
 Image Source:(Internet)
नागपूर :
हिवाळ्याची चाहूल आता विदर्भात (Vidarbha) स्पष्ट जाणवू लागली आहे. रविवारी सकाळी नागपूरसह अनेक जिल्यांत दवबिंदू, हलकं धुकं आणि गार वाऱ्यांनी वातावरण गारठलं. गोंदिया जिल्हा सर्वाधिक थंड ठरला असून, तेथे तापमान 11.5 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे.
 
भंडाऱ्यात 12 अंश, अमरावतीत 12.5, वाशीममध्ये 12.6, यवतमाळात 13 तर नागपूरमध्ये नीचांक 14.4 अंश सेल्सिअस इतका नोंदला गेला आहे. नागपूरचा हा तापमानाचा आकडा सामान्यपेक्षा सुमारे दोन अंशांनी कमी असून, हिवाळ्याची खरी सुरुवात झाल्याचे संकेत मिळत आहेत.
 
अकोला 14.3, बुलढाणा 13.8, चंद्रपूर 16.8 आणि ब्रह्मपुरी 15.4 अंश सेल्सिअस इतक्या नीचांकावर नोंदवले गेले आहेत. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या लहरींमुळे पुढील काही दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
 
गोंदिया, भंडारा आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये पारा 10 अंशांपर्यंत घसरण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
 
दिवसाही जाणवतोय गारवा :
फक्त सकाळ-संध्याकाळच नव्हे, तर आता दिवसाही थंडीचा गारवा जाणवू लागला आहे. शहरातील नागरिक गरम कपडे, स्वेटर, मफलरमध्ये गुंडाळलेले दिसत असून, चहाच्या टपऱ्यांवरही गर्दी वाढली आहे. रस्त्यांवर धुक्याची हलकी चादर आणि गार वाऱ्यांनी विदर्भात हिवाळ्याचा आनंददायी माहोल तयार झाला आहे.