नागपुरात युवकाची आत्महत्या; नंदनवन परिसरातील घटना,कारण अद्याप अस्पष्ट!

    01-Nov-2025
Total Views |
 
Youth commits suicide in Nagpur
 Image Source:(Internet)
नागपूर :
नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या चिटणीस नगर परिसरात एका 23 वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली असून, मृत तरुणाचे नाव संकेत शत्रुघ्न मसराम असे आहे. तो मिहान येथील हेक्सावेअर कंपनीत कार्यरत होता. आत्महत्येचे नेमके कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
 
मिळालेल्या माहितीनुसार, संकेत आपल्या कुटुंबासह चिटणीस नगरमध्ये भाड्याच्या घरात राहत होता. त्याचे वडील शिवणकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. बुधवारी एका नातलगाच्या निधनामुळे त्याचे आई-वडील वर्धा येथे गेले होते. त्या वेळी संकेत घरात एकटाच होता. त्याच काळात त्याने घरात गळफास लावून आत्महत्या केली.
 
शनिवारी सकाळी संकेतचा एक मित्र त्याला फोन करत होता, परंतु प्रतिसाद मिळत नसल्याने तो थेट त्याच्या घरी गेला. घरातून येणाऱ्या तीव्र दुर्गंधीमुळे आणि दरवाजा आतून बंद असल्याने मित्राने शेजाऱ्यांना आणि नंतर पोलिसांना माहिती दिली.
 
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा तोडला असता, संकेत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला असून, पुढील तपास सुरू आहे. संकेतने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट असून, पोलिस त्याचा तपास करत आहेत.