Image Source:(Internet)
नीरा :
राज्यातील शेतकऱ्यांची थकीत कर्जे माफ करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
शेट्टी म्हणाले, “न्यायव्यवस्था ही सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचतेय,” अशी टीका करत त्यांनी सरकार आणि न्यायालय दोघांनाही धारेवर धरले.
ते म्हणाले, “आम्ही गेल्या आठ-दहा महिन्यांपासून शेतकऱ्यांसाठी झगडतो आहोत. नागपूरच्या आंदोलनात हजारो शेतकरी पावसात, चिखलात बसले. पण सरकारला त्यांचं दु:ख दिसलं नाही. उलट न्यायालयानं मैदान मोकळं करण्याचा आदेश दिला. शेतकरी आत्महत्या करत असताना न्यायालय गप्प बसतं, पण आंदोलनामुळे रस्त्यावर अडचण झाली की लगेच आदेश कसे निघतात? यावरून स्पष्ट होतं की न्यायव्यवस्था आता राजकारण्यांच्या तालावर नाचते.”
शेट्टींनी सांगितलं की, सरकारशी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बजेटपर्यंत कोणताही निर्णय होऊ शकत नाही असं सांगितलं आहे. कारण सरकारची कर्ज घेण्याची मर्यादा संपली आहे. मात्र, त्यांनी ३० जून २०२५ पर्यंत शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची जबाबदारी उचलण्याचं आश्वासन दिलं आहे.
“सरकारने दिलेल्या या मुदतीत जर शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरून सरकारला उत्तर देऊ,” असा ठाम इशारा शेट्टींनी दिला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर भाष्य करताना ते म्हणाले, “राज्याची आर्थिक वाटचाल उद्धवस्त झाली आहे. आता जनतेने ठरवावं की पुन्हा फसव्या लोकांवर विश्वास ठेवायचा की नाही. जर पुन्हा तेच निवडून आले, तर परमेश्वर तुमचं रक्षण करो.”
बारामतीत एका सामाजिक कार्यक्रमात शेट्टींनी कार्यकर्ते सतीश काकडे यांच्या समाजकार्यातील योगदानाचं कौतुक केलं. “काकडे यांनी लोकवर्गणीतून गावात मंदिर आणि मशिद उभारली — हे सामाजिक ऐक्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे,” असं ते म्हणाले.
“आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी हरकत नाही,” असं शेट्टींनी ठणकावून सांगितलं. “शेतकरी आत्महत्या करत असताना आम्ही गप्प बसलो असतो का? आम्ही महात्मा गांधींच्या सविनय सत्याग्रहाच्या मार्गावर आहोत. सरकारकडे आमच्यावरचे गुन्हे मागे घेण्याची याचना करणार नाही.”
अजित पवार यांच्या विधानावर टीका करताना ते म्हणाले, “शेतकरी भिकारी नाही. सरकारने अशी यंत्रणा तयार करावी की शेतमालाला उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळू नये. आम्ही सतत कर्जमाफी मागणारे नव्हे, पण अन्याय झाल्यास ३० जूननंतर आम्ही रस्त्यावर उतरू,” असा पुन्हा एकदा सरकारला इशारा शेट्टींनी दिला.