विरोधकांच्या ‘सत्याच्या मोर्चा’मुळे मुंबईत राजकीय हलचल; पोलिसांचा तगडा बंदोबस्त

    01-Nov-2025
Total Views |
 
Truth March
 Image Source:(Internet)
मुंबई :
मतदार याद्यांमधील गोंधळ, बोगस नावे आणि मतचोरीच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी आज मुंबईत ‘सत्याचा मोर्चा’ (Truth March) काढला. या मोर्चामुळे संपूर्ण मुंबईत राजकीय तापमान चांगलेच चढले आहे.
 
या आंदोलनात काँग्रेस, उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट, मनसे, माकप, भाकप आणि शेकाप यांसह विविध संघटना एकत्र आल्या आहेत. दुपारी १ वाजता फॅशन स्ट्रीटवरून सुरू झालेला मोर्चा मेट्रो सिनेमाजवळून महापालिकेच्या प्रवेशद्वारापर्यंत निघाला.
 
मोर्चात सहभागी कार्यकर्त्यांनी “खोट्या मतदारांविरुद्ध खरे मतदार जागे व्हा!” आणि “लोकशाही वाचवा!” अशा घोषणा देत निवडणूक आयोगावर निशाणा साधला. विरोधकांनी आरोप केला आहे की, मतदार यादीतील फेरफार हा सत्ताधाऱ्यांचा राजकीय कट असून यामागे निवडणूकपूर्व डावपेच दडलेले आहेत.
 
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात केला असून वाहतूक मार्गात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. नागरिकांना CSMT परिसर टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
 
विरोधकांच्या मते, “हा मोर्चा लोकशाहीच्या संरक्षणासाठी आणि पारदर्शक निवडणुकीसाठी आहे.” दरम्यान, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असून, ‘सत्याचा मोर्चा’ हा मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दिशेने विरोधकांची ताकद दाखवणारा संकेत मानला जातो.