शासनाचा नवीन आदेश; ७ नोव्हेंबरला सर्व सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजेरी बंधनकारक

    01-Nov-2025
Total Views |
 
govt order Attendance
 Image Source:(Internet)
मुंबई :
राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी फडणवीस सरकारने (Government) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार, ७ नोव्हेंबर २०२५ रोजी सर्व अधिकारी व कर्मचारी कामावर उपस्थित राहणे अनिवार्य ठरवण्यात आले आहे.
 
हा आदेश राष्ट्रीय गीत **‘वंदे मातरम्’**च्या १५० व्या वर्षपूर्ती निमित्त जारी करण्यात आला आहे. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या या गीताचा गौरव साजरा करण्यासाठी राज्य सरकारकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्या पार्श्वभूमीवर सर्व स्तरांवर देशभक्तीचा जल्लोष साजरा होणार आहे.
 
शासन परिपत्रकानुसार, सर्व जिल्हा आणि तालुका मुख्यालयांवर सामूहिक वंदे मातरम् गान कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात शासकीय तसेच निमशासकीय विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
 
तहसिलदार (सर्वसाधारण), पुणे यांनीदेखील आपल्या अधिनस्त अधिकाऱ्यांना वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन केले असून, कार्यक्रम अनुशासित आणि उत्साही वातावरणात पार पाडण्याचे निर्देश दिले आहेत.
 
शिक्षण विभागाने यापूर्वीच ३१ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत सर्व शाळांमध्ये ‘वंदे मातरम्’च्या सर्व कडव्यांचे गायन, गीताचा इतिहास आणि माहितीपर प्रदर्शन आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत. विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
१८७५ साली ‘आनंदमठ’ या कादंबरीतून बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी ‘वंदे मातरम्’ची निर्मिती केली. या गीतातून उभ्या राहिलेल्या देशभक्तीच्या भावनेने स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा दिली.
 
आज, दीडशे वर्षांनंतरही हे गीत भारतीय जनमानसात तितक्याच अभिमानाने गुंजत आहे. या वर्षपूर्तीच्या निमित्ताने होणारा सामूहिक गान कार्यक्रम राज्यभर देशप्रेमाचा नवा उत्सव ठरण्याची शक्यता आहे. शासनाने नागरिकांनाही या सोहळ्यात सहभागी होऊन ‘वंदे मातरम्’ला अभिवादन करण्याचे आवाहन केले आहे.