नागपुरात एसटी बसमध्ये आग लागून खळबळ; प्रवाशांची जीवघेणी झुंबड, खिडक्यांतून बाहेर उड्या!

    01-Nov-2025
Total Views |
 
Fire breaks out in ST bus nag
 Image Source:(Internet)
नागपूर :
नागपुरात (Nagpur) शनिवारी सकाळी एक भयावह प्रसंग घडला. प्रवाशांनी भरलेली एसटी बस अचानक धुराने भरून गेल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही क्षणांतच बसमध्ये गोंधळ माजला आणि जीव वाचवण्यासाठी अनेक प्रवाशांनी खिडक्यांतून उड्या मारत बाहेर पडले.
 
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना डीसीपी झोन-२ कार्यालयाजवळ सकाळच्या सुमारास घडली. नागपूरहून प्रवास करत असलेली एसटी बस अचानक धूर सोडू लागली. सुरुवातीला प्रवाशांना काय घडतंय हे समजत नव्हतं, मात्र काही क्षणांतच धूर वाढू लागल्याने सर्वत्र किंचाळ्या ऐकू आल्या.
 
चालकाने प्रसंगावधान राखून तत्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबवली आणि इंजिन बंद केले. त्याचवेळी प्रवासी घाईघाईने बसमधून बाहेर पडू लागले. काही प्रवाशांनी दरवाजातून, तर काहींनी थेट खिडक्यांतून उड्या मारून आपला जीव वाचवला.
 
सुदैवाने या घटनेत कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून धूर नियंत्रणात आणला. प्राथमिक चौकशीत इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटमुळेच हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
दरम्यान, विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांनी संबंधित बसची तपासणी सुरू केली असून सुरक्षिततेसाठी ती तात्काळ डेपोमध्ये परत बोलावण्यात आली आहे.
 
स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे आणि चालकाच्या शिताफीमुळे “लाल परी” मोठ्या दुर्घटनेपासून थोडक्यात बचावली.