Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
हवामान विभागाने पुन्हा एकदा दक्षिण भारतातील राज्यांसाठी पावसाचा (Rain) इशारा दिला आहे. पुढील काही दिवसांमध्ये दक्षिण आणि ईशान्य भारतात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये १२ ऑक्टोबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ८ ते १२ ऑक्टोबरदरम्यान तामिळनाडू आणि केरळमध्ये मुसळधार पावसाचे वातावरण तयार झाले आहे. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्येही १० ऑक्टोबरपर्यंत जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, तेलंगणा आणि लक्षद्वीपच्या किनारी भागातही दोन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे.
दरम्यान, आंध्र प्रदेशातील रायलसीमा भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. तर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशातील काही भागातही हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.पूर्व आणि ईशान्य भारतातही वातावरण ढगाळ राहणार आहे. पश्चिम बंगाल, ओडिशा, सिक्किम, आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशात ८ ते १० ऑक्टोबरदरम्यान ठिकठिकाणी पावसाच्या सरी कोसळतील.
महाराष्ट्रातही पाऊस-
दक्षिण भारतासोबतच महाराष्ट्रालाही या हवामान बदलाचा परिणाम जाणवणार आहे. राज्याच्या दक्षिण-पश्चिम भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. कोकण आणि विदर्भाच्या काही भागांत ढगाळ वातावरण राहील, तर कधीकधी हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, या पावसामुळे काही भागात तापमानातही घट होण्याची शक्यता आहे. आगामी दोन ते तीन दिवस दक्षिण आणि पश्चिम भारतातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.