Image Source:(Internet)
मुंबई:
अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचे पती राज कुंद्रा यांना परदेशात प्रवास करायचा असल्यास आधी ६० कोटी रुपयांची रक्कम जमा करावी लागेल, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिला आहे. न्यायालयाने त्यांच्या अमेरिकेतील लॉस एंजेलिस किंवा इतर कोणत्याही देशातील प्रवासाला सध्या परवानगी दिली नाही. तसेच लूक आउट सर्क्युलर (LOC) रद्द करण्यासही न्यायालयाने नकार दिला आहे.
ही कारवाई ६० कोटी रुपयांच्या कथित फसवणूकप्रकरणाशी संबंधित आहे. शिल्पा-राज दांपत्याने आपल्याविरुद्ध जारी केलेला लूक आउट सर्क्युलर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, सुनावणीत न्यायालयाने ती याचिका निकाली काढली नसून पुढील सुनावणीची तारीख १४ ऑक्टोबर निश्चित केली आहे.
हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या (EOW) चौकशीत असून, व्यापारी दीपक कोठारी, संचालक – लोटस कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस, यांनी दिलेल्या तक्रारीवरून हे प्रकरण सुरू झाले आहे.
तक्रारीनुसार, २०१५ ते २०२३ दरम्यान शिल्पा आणि राज कुंद्रा यांनी कोठारी यांच्याकडून घेतलेल्या रकमांचा वापर व्यवसायासाठी न करता वैयक्तिक हेतूसाठी केल्याचा आरोप आहे. २०१५ मध्ये कुंद्रा दांपत्याने त्यांच्या ‘बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड’ या ऑनलाइन शॉपिंग आणि लाईफस्टाईल उत्पादने विकणाऱ्या कंपनीसाठी ७५ कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी केली होती.
सुरुवातीला १२ टक्के व्याजदराने कर्ज देण्याचे ठरले होते. मात्र नंतर हे कर्ज गुंतवणुकीच्या स्वरूपात घेतले जाईल असे सांगून कोठारी यांना दिशाभूल करण्यात आल्याचे म्हटले आहे. कोठारी यांनी एप्रिल २०१५ मध्ये ३१.९५ कोटी, आणि सप्टेंबर २०१५ मध्ये २८.५३ कोटी रुपये अशा दोन टप्प्यांत रक्कम ‘बेस्ट डील टीव्ही’च्या खात्यात वर्ग केली होती.
नंतर कोठारी यांना कळले की या कंपनीविरुद्ध आधीच दुसऱ्या गुंतवणूकदाराने फसवणुकीचा दावा दाखल केला आहे आणि दिवाळखोरी प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यांनी अनेक वेळा पैसे परत मिळविण्याचा प्रयत्न केला, परंतु निष्फळ ठरल्याने त्यांनी या दांपत्यावर निधीचा वैयक्तिक फायद्यासाठी गैरवापर केल्याचा आरोप करत पोलीस तक्रार दाखल केली.आता न्यायालयाच्या निर्देशानुसार, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी ६० कोटी रुपयांची भरपाई केल्याशिवाय देशाबाहेर जाण्यास परवानगी मिळणार नाही.