Image Source:(Internet)
मुंबई :
राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडले आहेत. अनेक जिल्ह्यांतील शेतीचे प्रचंड नुकसान, जनावरांचा मृत्यू आणि घरांचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अखेर मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला असून, अतिवृष्टीग्रस्त (Heavy rains) शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचं विशेष मदत पॅकेज घोषित करण्यात आलं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा मोठा निर्णय जाहीर केला. फडणवीस म्हणाले, “शेतकऱ्यांना संकटाच्या काळात सरकार एकटं सोडणार नाही. पावसामुळे झालेलं नुकसान शक्य तितकं भरून काढलं जाईल.”
या पॅकेजनुसार –
- कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १८,५०० रुपये,
- हंगामी बागायतींसाठी २७,००० रुपये,
- तर बागायती शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ३२,५०० रुपयांची मदत मिळणार आहे.
याशिवाय ज्यांच्या विहिरींचं नुकसान झालं आहे, त्या शेतकऱ्यांना ३०,००० रुपयांची स्वतंत्र मदत देण्यात येणार आहे. पावसामुळे घरांचे नुकसान झालेल्यांना पीएम आवास योजनेंतर्गत नवं घर, तर अंशतः बाधितांना घर दुरुस्तीसाठी आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे.
ज्यांच्या शेतजमिनी वाहून गेल्या आहेत, त्यांना प्रति हेक्टर ३.५ लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जाईल. त्यापैकी ४७ हजार रुपये रोख, आणि उर्वरित रक्कम मनरेगा योजनेतून दिली जाईल.
जनावरे दगावलेल्या शेतकऱ्यांनाही सरकारने प्रति जनावर ३७ हजार रुपयांची भरपाई देण्याची घोषणा केली आहे. तसेच ग्रामविकास आणि रस्ते पुनर्बांधणीसाठी १० हजार कोटींचा निधी राखून ठेवण्यात आला आहे.
फडणवीस यांनी सांगितलं की, पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई मिळावी यासाठी विमा कंपन्यांवर सरकारचा दबाव राहील.
सरकारच्या या निर्णयामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मोठा दिलासा मिळणार असून, राज्यभरातील शेतकरी संघटनांकडून या पॅकेजचं स्वागत करण्यात आलं आहे.