अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा नाही, काँग्रेसची सरकारवर जोरदार टीका

    07-Oct-2025
Total Views |
 
Vijay Wadettiwar Farmers affected Heavy rains
 Image Source:(Internet)
नागपूर :
अतिवृष्टीमुळे (Heavy rains) मोठ्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 31,628 कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची घोषणा केली आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर करण्यात आला. मात्र, या मदतीवरून काँग्रेसच्या विधानसभेतील नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर कठोर टीका केली आहे.
 
शेतकऱ्यांसोबत सरकारची खिल्ली-
विजय वडेट्टीवार यांनी म्हटले की, महायुती सरकार शेतकऱ्यांची खिल्ली करत आहेत. मराठवाड्यात जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान 781 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. केवळ मागील 15 दिवसांत 74 शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला. अशा वेळी सरकारने फक्त मदतीचे आकडे जाहीर केले; हेच शेतकऱ्यांसोबत खिल्ली असल्याचे वडेट्टीवार यांनी अधोरेखित केले.
 
हेक्टरी 50 हजार रुपयांची अपेक्षा होती-
वडेट्टीवार पुढे म्हणाले, “राज्यातील शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली आहे, जनावरही नष्ट झाले आहेत. अशा वेळी प्रति हेक्टर 50 हजार रुपयांची मदत अपेक्षित होती. मात्र सरकारने NDRF निकषांनुसार दिलेली मदत अत्यंत तुटपुंजी आहे, ज्यामुळे शेतकरी उभा राहणार नाही, तर अधिक उद्ध्वस्त होईल. पंजाबसारखे राज्य केंद्राची मदत न घेता प्रति हेक्टर 50 हजार रुपये देऊ शकतात, तर महाराष्ट्रासारख्या समृद्ध राज्यात का नाही?”
 
वडेट्टीवार यांनी असा प्रश्न उपस्थित केला की, दिवाळीपूर्वी ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे का? शेतमजूरांसाठी काय उपाययोजना आहेत?
 
कर्जमाफीवरही नाराजी-
विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी महायुतीने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. विजय वडेट्टीवार म्हणाले, “आज शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा आहे, पण सरकार अजूनही फक्त तारीख बदलत आहे; नेमकं कधी कर्जमाफी मिळणार याची स्पष्ट माहिती नाही.”
 
शेतकरी संघटना आणि विरोधी पक्ष या निर्णयावर नाराज असून, सरकारकडून तत्काळ आणि ठोस मदत देण्याची मागणी केली जात आहे.