Image Source:(Internet)
मुंबई:
राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आपल्या मंत्री पदाचा संपूर्ण वर्षभराचा पगार रु. ३१,१८,२८६ मुख्यमंत्री सहायता निधीस दान केला आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत त्यांनी याबाबतचा धनादेश आणि संमतीपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केले. अशा कृतीमुळे ते राज्यातील पहिले मंत्री ठरले आहेत जे संपूर्ण वर्षभराचा वेतन निधीस देतात.
राज्यात मुसळधार पावसामुळे आणि महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, सोलापूर तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि नाशिक येथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि नुकसानग्रस्तांची स्थिती पाहिली.
गिरीश महाजन यांनी सांगितले, “राज्यातील नागरिकांसाठी संकटमोचक बनून मदत करणे ही आमची जबाबदारी आहे. राज्य सरकार जनतेच्या पाठीशी खंबीर असून, माझा पगार मुख्यमंत्री सहायता निधीस देऊन मी त्यामध्ये योगदान देत आहे.”
सध्याच्या मंत्री पदाची शपथ घेतल्यापासून डिसेंबर 2024 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत मिळालेल्या संपूर्ण वेतनाची रक्कम निधीस दिली गेली आहे. मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून पूर, दुष्काळ, आग किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना त्वरित आर्थिक मदत दिली जाते.
मंत्री महाजन यांची ही उदार कृती राज्यातील इतर सेवाभावी व्यक्ती आणि लोकप्रतिनिधींसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे.