Image Source:(Internet)
मुंबई :
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यावेळी कारण चित्रपट नसून एक मोठं आर्थिक फसवणुकीचं प्रकरण आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) सोमवारी शिल्पा शेट्टीची तब्बल ५ तास कसून चौकशी केली असून, या चौकशीनंतर तिच्या अडचणीत अधिक वाढ झाली आहे.
ही चौकशी लोटस कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे संचालक दीपक कोठारी यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून करण्यात आली आहे. कोठारी यांनी आपल्या तक्रारीत शिल्पा शेट्टी आणि तिचे पती राज कुंद्रा यांच्यावर ६० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप केला आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
तक्रारीनुसार, २०१५ मध्ये शिल्पा शेट्टीने ७५ कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी केली होती. मात्र, नंतर त्यांनी ही रक्कम कर्जाऐवजी “गुंतवणूक” म्हणून स्वीकारण्याचा प्रस्ताव दिला. कोठारी यांनी या प्रस्तावावर विश्वास ठेवून दोन हप्त्यांमध्ये — एप्रिल २०१५ मध्ये ३१.९५ कोटी आणि सप्टेंबर २०१५ मध्ये २८.५३ कोटी रुपये — अशा एकूण ६० कोटी रुपयांची रक्कम दिली.
कोठारींचा आरोप आहे की, शिल्पा आणि राज कुंद्रा यांनी व्यवसाय विस्ताराच्या नावाखाली ही रक्कम घेतली, पण ती वैयक्तिक कारणांसाठी वापरली. पैसे मागूनही त्यांनी ती रक्कम परत केली नाही. त्यामुळेच त्यांनी पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली.
पोलिसांची कारवाई-
या प्रकरणात आतापर्यंत राज कुंद्रासह पाच जणांचे जबाब नोंदवले गेले आहेत. सप्टेंबर महिन्यातच आर्थिक गुन्हे शाखेने शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राविरुद्ध लूकआउट सर्क्युलर जारी केले होते, जेणेकरून ते देशाबाहेर पळ काढू शकणार नाहीत.
शिल्पा शेट्टीची भूमिका-
दरम्यान, शिल्पा शेट्टी आणि तिचे वकील प्रशांत पाटील यांनी सर्व आरोपांना “खोटे आणि निराधार” म्हटले आहे.
“आम्ही कायद्याचा पूर्ण आदर करतो आणि तपास यंत्रणेसमोर सत्य मांडू,” असे पाटील यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणातील चौकशी पुढील काही दिवसांत आणखी खोलवर जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यासाठी हा वादाचा नवा टप्पा ठरणार आहे.