Image Source:(Internet)
मुंबई :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) भरती अर्ज प्रक्रियेत मोठा बदल करत उमेदवारांसाठी नवे नियम जाहीर केले आहेत. यानुसार, उमेदवारांच्या विविध दाव्यांची पडताळणी आता मुलाखतीच्या वेळी नव्हे, तर अर्ज सादरीकरणाच्या टप्प्यावरच केली जाणार आहे. म्हणजेच, उमेदवाराने दावा केलेल्या सर्व कागदपत्रांचा पुरावा अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
या संदर्भात आयोगाने अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध करत नवी प्रणाली लागू केली आहे. नव्या नियमांनुसार, पात्र उमेदवारांनी अर्ज करताना ऑनलाइन पद्धतीने आवश्यक पुरावे सादर करणे बंधनकारक आहे. यासाठी आयोगाने सुमारे 20 प्रकारच्या आवश्यक कागदपत्रांची यादी देखील प्रसिद्ध केली आहे.
यामध्ये सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, माजी सैनिक, खेळाडू, दिव्यांग, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, अनाथ तसेच अंशकालीन कर्मचारी अशा विविध दाव्यांशी संबंधित प्रमाणपत्रांचा समावेश आहे. तसेच शैक्षणिक पात्रतेचा पुरावा, जन्मतारीख, अधिवास (डोमिसाईल), अनुभवपत्र, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आणि मराठी भाषेचे ज्ञान दाखवणारे प्रमाणपत्र ही कागदपत्रेही आवश्यक आहेत.
जर कोणत्याही उमेदवाराने वैध स्वरूपातील कागदपत्रे अपलोड केली नाहीत, तर त्याचा अर्ज अपूर्ण मानला जाणार आहे. मात्र अशा उमेदवारांना आयोगाकडून एकच अतिरिक्त संधी दिली जाईल. त्यासाठी सात दिवसांची मुदत ठेवण्यात आली आहे. या कालावधीत आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक असेल. याबाबत उमेदवारांना एसएमएस, ई-मेल किंवा MPSC संकेतस्थळावरील अधिसूचनेद्वारे कळवले जाईल.
यानंतर आयोगाकडून सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल आणि योग्य उमेदवारांच्या दाव्यांना अंतिम मान्यता देण्यात येईल. यानंतरच संबंधित उमेदवार पुढील निवड प्रक्रियेसाठी पात्र ठरतील.
दरम्यान आता MPSC अर्ज करताना उमेदवारांना सर्व कागदपत्रे एकाचवेळी सादर करावी लागणार असून, पडताळणीची प्रक्रिया अधिक पारदर्शक व जलद होणार आहे.