दिवाळीनंतर लगेच लागू होणार आचारसंहिता; चंद्रकांत पाटील यांची माहिती

    06-Oct-2025
Total Views |

 
Chandrakant PatilImage Source:(Internet)

मुंबई :
महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी भाजपच्या ‘विजयी संकल्प मेळावा’त या संदर्भात मोठा दावा केला. त्यांनी सांगितले की, दिवाळीनंतर दोन दिवसांत आचारसंहिता लागू होईल आणि महापालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

स्थानिक स्तरावरील निवडणुका खरी लोकशाही-
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका खऱ्या अर्थाने लोकशाहीतील मूळ प्रक्रियाच आहेत, लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकांपेक्षा यांचे महत्त्व जास्त आहे. “कदाचित दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी जिल्हा परिषद निवडणुकीची अधिकृत घोषणा होईल. निवडणूक आयोगाशी माझा काही संबंध नाही, परंतु 40 वर्षांच्या राजकीय अनुभवावरून हा अंदाज मी व्यक्त करत आहे,” असे ते म्हणाले.

 

ते पुढे म्हणाले, “2019 साली ज्यांच्या तिकिटांचा नाकार झाला, त्यांना 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार ठरवण्याचे अधिकार मिळाले. निवडणूक ही जलदगती ट्रेनसारखी असते. प्लॅटफॉर्मवर उभे राहिलेलेच पुढे जातात. मात्र, कार्यकर्त्यांनी निराश होऊ नये; राजकारणात फक्त प्रयत्न पुरेसे नसतात, नशीबही महत्त्वाचे असते. या दिवाळीतून लोकांशी संपर्क वाढवा आणि महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याची तयारी ठेवा. अंतिम निर्णय वरिष्ठ नेत्यांकडे राहतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरेंवर टीका-
चंद्रकांत पाटील यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीचा संदर्भ देत उद्धव ठाकरेंवर टीका केली. “त्या वेळी उद्धव ठाकरेंनी थोडा समजूतदारपणा दाखवला असता तर काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी करावी लागली नसती. नियतीचं काम नियती करतं; 2019 मध्ये सरकार जाण्याची प्रक्रिया नियतीचं ठरलेलं काम होती. पण या सगळ्यात उद्धव ठाकरेंला काय मिळालं?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

 

चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना संदेश दिला, “मी कधीच स्वतःसाठी तिकीट मागितलं नाही. नेत्याची इच्छा म्हणजे कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शन असतं. निवडणुका येतात-जातात, पण पक्षासाठी काम करणं थांबवता कामा नये.”