सुप्रीम कोर्टात गोंधळ; सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न

    06-Oct-2025
Total Views |
 
Bhushan Gavai
 Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) घडलेली एक घटना देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. सुनावणीदरम्यान एका वकिलाने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडे बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वेळेत हस्तक्षेप करून वकिलाला रोखले.
 
घटनेच्या वेळी न्यायालयात प्रकरणाची सुनावणी सुरु होती. अचानक संबंधित वकील मंचाजवळ आला आणि बूट काढून फेकण्याचा प्रयत्न केला. तत्काळ उपस्थित सुरक्षारक्षकांनी त्याला पकडून कोर्टाबाहेर नेले. बाहेर नेले जात असताना तो “सनातनचा अपमान सहन करणार नाही” असे घोषवाक्य देत ओरडत होता.
 
या संपूर्ण प्रसंगात सरन्यायाधीश गवई शांत राहिले. त्यांनी उपस्थितांना संबोधित करत म्हटलं, “अशा प्रकारांनी आम्ही विचलित होत नाही. कृपया तुमचा युक्तिवाद सुरू ठेवा.” त्यांच्या या शांत आणि संयमी प्रतिक्रियेचे अनेकांनी कौतुक केले आहे.
 
ही घटना खजुराहो येथील भगवान विष्णूंच्या नुकसानग्रस्त मूर्तीच्या पुनर्स्थापनेसंदर्भातील याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान घडली. या प्रकरणात सरन्यायाधीशांनी पूर्वी दिलेल्या “देवांनाच काहीतरी करायला सांग” या वक्तव्यावरून काही संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या विरोधात टीका आणि राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती.
 
सुरक्षा अधिकाऱ्यांनी मात्र न्यायालयात “हल्ला झाला नाही, फक्त एका व्यक्तीने ओरडून गोंधळ घातला” असे स्पष्ट केले आहे. तरीही ही घटना सर्वोच्च न्यायालयाच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करत आहे.