Image Source;(Internet)
पुणे :
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत आज विविध राजकीय विषयांवर भाष्य केलं. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तीन पक्ष शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार का, असा प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की, हा निर्णय तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन घ्यायचा आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणे तिन्ही पक्ष एकत्र लढले तर चांगलं होईल, पण कुणाला स्वतंत्र लढायचं असेल तर तो निर्णयही आदराने मान्य करावा लागेल. स्थानिक निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांच्या भावना महत्त्वाच्या असतात, त्या समजून घेतल्या पाहिजेत, असं ते म्हणाले.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, शिवसेनेची ताकद पुण्यात आहे. मात्र, आम्ही युती आणि आघाडीचे बळी ठरलो. त्या काळात पुण्याकडे दुर्लक्ष झालं, त्याबद्दल मी पुणेकरांची माफी मागतो. पण जर पुणेकरांनी पुन्हा विश्वास दाखवला, तर मी स्वतः इथं येऊन शिवसेनेला नव्याने उभं करीन. तुम्ही जर प्रेमाने बोलावलं, तर मी नक्कीच पुण्यात येईन, असंही त्यांनी सांगितलं.
राज्याच्या राजकारणावर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी कुणालाही शत्रू मानत नाही, मोदींनाही नाही. ते मला शत्रू मानतात का, माहीत नाही. देवेंद्र फडणवीस हे एवढ्या बहुमतासह, केंद्राचं पाठबळ असूनही हतबल झाले आहेत, हे आश्चर्यकारक आहे. आम्ही मागच्या अधिवेशनात काही मंत्र्यांविरोधात पुरावे सादर केले, तरीही सरकारनं कोणतीही कारवाई केली नाही. म्हणजेच खुलेआम भ्रष्टाचार सुरू आहे आणि त्यावर सरकार मौन बाळगून आहे.
उद्धव ठाकरेंनी या पत्रकार परिषदेतून पुन्हा एकदा स्पष्ट केलं की, शिवसेना पुण्यात आपली गढी परत मिळवण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करेल आणि लोकांनी साथ दिली तर पक्ष पुन्हा नव्या ऊर्जेने पुढे येईल.