- मच्छीमारांना खोल समुद्रात न जाण्याचे आवाहन
Image Source:(Internet)
मुंबई :
काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि कोकण पट्ट्यात मोठ्या प्रमाणात हानी केली होती. शेतपिकं उद्ध्वस्त झाली, घरं कोसळली आणि अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. लोक अजूनही या आपत्तीमधून सावरलेले नाहीत, तोपर्यंत आता ‘शक्ती’ (Shakti) नावाचं आणखी एक अस्मानी संकट महाराष्ट्राच्या दिशेने येत असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, ७ ऑक्टोबरपर्यंत ‘शक्ती’ चक्रीवादळ अरबी समुद्रातून किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये तीव्र पावसाचा आणि वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागातही ढगफुटीच्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
या पार्श्वभूमीवर मच्छीमारांनी खोल समुद्रात न जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये आपत्कालीन पथकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, बचाव आणि मदतकार्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बीड, धाराशिव, जालना, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले होते. दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. लाखो हेक्टरवरील शेतपिकं पाण्याखाली गेली असून, शेतकऱ्यांनी ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून एकरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी केली आहे.
राज्य सरकारकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून, चक्रीवादळाचा परिणाम कमी व्हावा यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.