बारवाले, कृतघ्न आणि भुंकणारे…;भास्कर जाधवांचा रामदास कदमांवर हल्लाबोल

    04-Oct-2025
Total Views |
 
Bhaskar Jadhav attack on Ramdas Kadam
 Image Source:(Internet)
मुंबई :
दोन्ही शिवसेनांच्या दसरा मेळाव्यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संतापाचे वादळ उठले आहे. शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनासंदर्भात केलेल्या विधानाने ठाकरेंच्या गटात संतापाची लाट उसळली आहे. कदम यांनी विचारलेला प्रश्न बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर का ठेवण्यात आला? या वाक्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
 
या वक्तव्यावर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी सडकून प्रतिक्रिया देत कदमांवर तिखट शब्दांत हल्ला चढवला आहे. भास्कर जाधव यांनी आपल्या भाषणात कदमांवर जोरदार प्रहार करताना म्हटलं की, रामदास कदम स्वतःला बाळासाहेबांचे भक्त म्हणवतात आणि त्यांच्याच विरोधात विषारी भाष्य करतात. हे भक्त नव्हेत, बामदास कदम आहेत. ते छमछम बारवाले आहेत. महिलांकडून पैसे कमावून ते उडवतात, त्यामुळे त्यांच्या तोंडून गलिच्छ शब्दच बाहेर पडतात.
 
जाधवांनी पुढे कदमांच्या राजकीय प्रवासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी म्हटलं की, शिवसेनेने ३२ वर्षे कदमांना लोकप्रतिनिधी बनवलं, पण त्यांनी एकदाही कृतज्ञता दाखवली नाही. कारण ते कृतघ्न आहेत. आज ज्या शिंदे गटात ते नेते आहेत, त्या पक्षालाही त्यांच्याविषयी आदर नाही. तीन वर्षांत एकदाही त्यांना प्रमुख वक्ते म्हणून बोलावलं नाही. यावरूनच त्यांची किंमत समजते.
 
आपली टीका आणखी तीव्र करत जाधव म्हणाले की, रामदास कदम यांच्याकडून प्रबोधनाची अपेक्षा करणे म्हणजे चंद्राला हात लावण्यासारखे आहे. अशा लोकांना किंमत नसते. ते फक्त मेळाव्यांमध्ये भुंकतात आणि तेव्हाच त्यांना ओळख मिळते. म्हणूनच कदम हे श्वानासारखे आहेत.
 
या वक्तव्यांमुळे ठाकरे गट आणि शिंदे गटातील जुना संघर्ष पुन्हा भडकला आहे. कदमांच्या विधानावरून निर्माण झालेल्या वादात आता भास्कर जाधवांनी केलेल्या प्रतिउत्तरामुळे राजकीय तापमान आणखी वाढले आहे. आता रामदास कदम यांचं उत्तर काय येतं, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांच्या रणांगणात उतरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.