Image Source;(Internet)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व महिलांसाठी ई-केवायसी (E KYC) अनिवार्य केले गेले आहे. शासनाने या प्रक्रियेसाठी दोन महिन्यांचा कालावधी दिला असला, तरी अनेक महिलांना ई-केवायसी करताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः ओटीपी न येणे, नेटवर्क समस्या आणि तांत्रिक त्रुटीमुळे अनेक महिला त्रस्त झाल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी महिलांना दिलासा दिला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत स्पष्ट केले की, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेत काही तांत्रिक अडचणी उद्भवत आहेत, विशेषतः OTP मिळण्यात अडचण येत आहे. महिला व बालविकास विभागाने या समस्येवर त्वरित लक्ष दिले आहे. तज्ज्ञांच्या माध्यमातून उपाययोजना सुरू असून लवकरच ही अडचण दूर होईल आणि ई-केवायसी प्रक्रिया अधिक सुलभ होईल."
तटकरे यांनी आश्वासन दिले की येत्या काही दिवसांत महिलांना केवायसी प्रक्रियेत कोणताही त्रास होणार नाही. या निर्णयामुळे लाभार्थींना मोठा दिलासा मिळणार आहे.
याशिवाय, केवायसी प्रक्रियेत आणखी एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. आता महिलांसोबत त्यांचे पती किंवा वडील यांचीही केवायसी केली जाणार आहे. या प्रक्रियेतून कुटुंबाचे उत्पन्न तपासले जाईल, आणि २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या कुटुंबांना योजनेचा लाभ मिळणार नाही. शासनाचा हा निर्णय योजनेचा लाभ खऱ्या गरजू महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी आहे.
‘लाडकी बहीण’ योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांना आर्थिक बळ मिळणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात तांत्रिक अडचणींमुळे होणारा त्रास आता दूर केला जाईल, आणि महिलांना कोणत्याही अडचणीशिवाय ई-केवायसी करता येईल, असा विश्वास आदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे.