Image Source:(Internet)
मुंबई :
आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तोंडावर असताना शिवसेना (ठाकरे गट) साठी अनपेक्षित बातमी समोर आली आहे. पक्षाचे जाहीर प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे पुढील दोन महिने सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहणार असल्याचे समोर आले आहे.
राऊत यांनी आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून एक पत्र जारी केले असून त्यात त्यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे विश्रांती घेण्याची गरज असल्याचे नमूद केले आहे. “आपल्या सर्वांच्या प्रेम आणि विश्वासाने मी नेहमीच काम केलं आहे, पण सध्या माझ्या आरोग्यात काही गंभीर समस्या उद्भवल्या आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला सार्वजनिक जीवनापासून थोड्या काळासाठी दूर राहावं लागेल,” असं त्यांनी म्हटलं आहे.
ते पुढे म्हणतात, “मी लवकरच ठणठणीत बरा होऊन नवीन वर्षात पुन्हा भेटेन. तोपर्यंत आपले आशीर्वाद आणि साथ कायम ठेवा.” त्यांच्या या भावनिक पत्रामुळे शिवसैनिकांमध्ये आणि ठाकरे गटाच्या वर्तुळात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
राऊत यांनी नेमक्या आजाराचा उल्लेख केलेला नसला तरी, त्यांच्या अनुपस्थितीमुळे निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठं राजकीय नुकसान सहन करावं लागेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
संजय राऊत हे ठाकरे गटाचे मुखर आणि प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. विरोधकांवर तीक्ष्ण हल्ले करण्याची त्यांची शैली पक्षासाठी नेहमीच बळ ठरली आहे. त्यामुळे त्यांच्या विश्रांतीच्या निर्णयामुळे प्रचार मोहिमेच्या गतीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.