Image Source:(Internet)
मुंबई :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्य सरकारच्या "नमो पर्यटन केंद्र" योजनेवर जोरदार टीका करत तीव्र शब्दांत इशारा दिला आहे. ऐतिहासिक किल्ल्यांवर जर नमो पर्यटन केंद्रे उभारली गेली, तर मनसे कार्यकर्ते ती पाडतील, असा इशारा ठाकरे यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला.
मुंबईत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ठाकरे म्हणाले, “हे किल्ले साधे स्थळ नाहीत; ही महाराष्ट्राच्या इतिहासाची ओळख आहेत. जर कोणी राजकारणासाठी या किल्ल्यांवर नमो केंद्र उभारण्याचा विचार करत असेल, तर आम्ही ते केंद्र पाडून टाकू.”
राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना उद्देशून म्हटले, “त्यांना नमो सेंटर बांधू द्या, पण आम्ही ते उद्ध्वस्त करू. राज्याच्या गौरवस्थानांवर अशी केंद्रे बांधणे म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान आहे.”
या योजनेसाठी राज्य सरकारने तब्बल २० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे वृत्त समोर आले आहे. यावर प्रतिक्रिया देताना ठाकरे म्हणाले, “इतिहासाशी खेळणे थांबवा. उपमुख्यमंत्री राहण्यासाठी इतकी खुशामत करावी लागते का? पंतप्रधानांनाही या खुशामतीचे प्रमाण कदाचित समजत नसेल.”
राज ठाकरेंच्या या विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मनसेने स्पष्ट केले आहे की महाराष्ट्राच्या किल्ल्यांवर ‘नमो’ किंवा इतर कोणत्याही राजकीय नावाचे केंद्र उभारण्यास ते कधीही अनुमती देणार नाहीत.