भाजप कार्यकर्ता शरद पवारांच्या बैठकीत? सोलापूर राष्ट्रवादीत खळबळ; फोटो व्हायरल होताच चर्चांना उधाण!

    31-Oct-2025
Total Views |
 
BJP worker at Sharad Pawar
 Image Source:(Internet)
मुंबई :
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या वतीने मुंबईत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत अनपेक्षित वाद निर्माण झाला आहे.
 
सोलापूर शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुधीर खरटमल यांनी स्वतः न जाता भाजपाशी संबंधित कार्यकर्त्यालाच या बैठकीला पाठवल्याचा आरोप पुढे आला आहे. यामुळे सोलापूर राष्ट्रवादीत संतापाची लाट उसळली असून, पक्षात चांगलीच खळबळ माजली आहे.
 
बैठकीला खरटमल यांच्या ऐवजी गेलेल्या महेश गाडेकर यांचे भाजप नेत्यांसोबतचे जुने फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो समोर आल्यानंतर गाडेकर हे भाजपाचे कार्यकर्ते असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
 
दरम्यान, या वादावर प्रतिक्रिया देताना सुधीर खरटमल म्हणाले, "मी स्वतः बैठकीला जाणार होतो, मात्र माझे तिकीट कन्फर्म न झाल्याने जाणे शक्य झाले नाही. त्यामुळे मुंबईत असलेल्या माझ्या ओळखीतील महेश गाडेकर यांना मी पक्षाच्या बैठकीचा आढावा घेण्यासाठी पाठवले," असे त्यांनी स्पष्ट केले.
 
या घटनेनंतर सोलापूरमधील काही राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी खरटमल यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारल्याची माहितीही समोर आली आहे. प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी या संपूर्ण प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे.
 
भाजप कार्यकर्त्याला शरद पवारांच्या बैठकीला पाठवण्याचा हा प्रकार उघड झाल्याने सोलापूर राष्ट्रवादीत मोठी अंतर्गत धुसफूस उफाळून आली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद पक्षासाठी आणखी डोकेदुखी ठरू शकतो, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.