शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा येईपर्यंत मागे हटणार नाही; बच्चू कडूंचा सरकारला इशारा

    31-Oct-2025
Total Views |
 
Bachchu Kadu warns government
 Image Source:(Internet)
नागपूर :
राज्यात पुन्हा एकदा कर्जमाफीचा प्रश्न डोक्यावर आला असून, शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. “जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचा पैसा जमा होत नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन थांबणार नाही. घोषणा करून सरकार पळ काढणार असेल, तर आम्ही शांत बसणार नाही,” असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.
 
कडूंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या परस्परविरोधी विधानांवरून सरकारवर टीकेची झोड उठवली. “मुख्यमंत्री एक सांगतात आणि उपमुख्यमंत्री दुसरंच म्हणतात, मग शेतकऱ्यांनी विश्वास ठेवायचा कोणावर?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
 
ते पुढे म्हणाले, “सरकारने कर्जमाफीसाठी ठराविक तारीख जाहीर केली आहे. जर हा निर्णय मनापासून घेतला असेल, तर आम्ही स्वागत करू; पण जर ही फसवणूक ठरणार असेल, तर प्रहार संघटना गप्प बसणार नाही.”
 
भावनिक होत त्यांनी सांगितलं, “शेतकऱ्यांसाठी आम्ही रस्त्यावर लढलो, रक्त सांडलं. आमच्यावर आरोप करणाऱ्यांना सांगतो.आमचं मन पारदर्शक आहे. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी मी जीव देईन, पण माघार घेणार नाही.”
 
कराले मास्टरांचा उल्लेख करत कडूंनी म्हटलं, “ते आज बैठकीला येऊ शकले नाहीत, पण त्यामागं काही कारण असेल. मात्र काही लोक सोशल मीडियावर बसून आमच्यावर टीका करत आहेत, हे लाजिरवाणं आहे. जे कधी संघर्षात उतरले नाहीत, तेच आज आम्हाला उपदेश देत आहेत.”
 
कर्जमाफीच्या निर्णयासंदर्भात कडूंनी म्हटलं की, “मार्च २०२६ पर्यंतचं सर्व कर्ज माफ करण्यात येणार आहे. जून २०२६ हा शेतकऱ्यांसाठी निर्णायक ठरणार आहे. आम्ही जे ठरवलंय, ते करूनच राहू.”
 
सरकारला अंतिम मुदत देताना त्यांनी स्पष्ट केलं, “३० जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली पाहिजे. नाहीतर हे आंदोलन राज्यभर पेटेल. आमच्यावर गुन्हे दाखल केले तरी आम्ही मागे हटणार नाही.”
 
शेवटी कडूंनी सरकारला थेट आव्हान दिलं, “आम्ही अजून जिवंत आहोत आणि शेतकऱ्यांसाठी झगडतोय. आमचा आवाज कोणीही दाबू शकत नाही. सरकारने वचन मोडलं, तर रस्त्यांवर रण पेटेल.”
 
राज्यात या वक्तव्यानंतर शेतकरी चळवळीला नवी दिशा मिळाल्याचं दिसतंय. पुढील काही दिवसांत सरकार आणि प्रहार संघटनेतील संघर्ष अधिक तापणार, अशी चिन्हं दिसत आहेत.